सारीपाट, सदगुरू पाटील, संपादक
दामू नाईक हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दामूंचा पहिला वाढदिवस काल साजरा झाला. मी स्वतः वातावरणाचा फिल घ्यावा आणि दामूंना शुभेच्छा द्याव्यात या हेतूने काल भाजपच्या पणजी कार्यालयाला दुपारी भेट दिली. भाजपचे पदाधिकारी, आमदार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहात होता. दामू नाईक यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी दुपारी पक्ष कार्यालयात सामान्य कार्यकर्त्यांनी, युवा कार्यकर्त्यांनी खूप गर्दी केली होती. पाऊस नव्हता, त्यामुळे गैरसोय झाली नाही. भाजप कार्यालयाची लिफ्ट कुणालाच मोकळी मिळत नव्हती. हातात फुलांचे मोठमोठे गुच्छ घेतलेले कार्यकर्ते तीन मजले चढून कार्यालयात जात होते. दामूही उत्साहात होते. मिठ्या मारून दामूंना कार्यकर्ते शुभेच्छा देत होते. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाला, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे असे दामू मागे म्हणाले होते, तसाच अनुभव कालदेखील आला.
दामू नाईक यांना बोलायला आणि घोषणा करायला आवडते. मंत्रिमंडळाची फेररचना कोणत्याही क्षणी होऊ शकते, अशी घोषणाही पूर्वी त्यांनी केली आहे. अर्थात तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असेही ते बोलले आहेत. काल प्रदेशाध्यक्षांनी ५१ टक्के मते मिळवूया असा संकल्प नव्याने सोडला.विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने २७ जागा जिंकायला हव्यात, पण त्याचबरोबर ५१ टक्के मते मिळवायला हवीत असे दामूंना वाटते. २०१४ साली लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला ५१ टक्के मते मिळाली होती आणि त्यामुळे एवढी मते मिळणे शक्य आहे, हे एकदा सिद्ध झाले आहे, असे दामू म्हणतात. अर्थात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा उमेदवार दक्षिण गोव्यात जिंकू शकला नाही, ही वस्तुस्थितीदेखील लक्षात घ्यावी लागेल. २०१९ सालीही भाजप उमेदवार दक्षिणेत जिंकला नाही.
लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक यात खूप फरक असतो, मतांमध्येही त्यामुळेच फरक निर्माण होतो. विधानसभेवेळी बंडखोरी होते, कार्यकर्ते फुटतात, नेते तिकिटासाठी दुसरीकडे जातात, कुणी अपक्ष लढतात तर कुणी पक्षातच राहून पक्षाचे अधिकृत उमेदवार पाडतात. केपेत बाबू कवळेकर यांना पाडले गेले, साळगावमध्ये जयेश साळगावकर यांना पराभूत केले गेले, मांद्रेत दयानंद सोपटे यांना पाडले गेले, शिवोलीत दयानंद मांद्रेकर यांना पराभवाचे पाणी पाजले गेले.. अशी अनेक उदाहरणे आहेत. भाजप कार्यकर्ते दरवेळी पक्षाचा अधिकृत उमेदवार स्वीकारतातच असे नाही. तरी देखील ५१ टक्के मते मिळविण्याचा दामू नाईक यांचा संकल्प चांगलाच आहे. तो धाडसी व कौतुकास्पदही आहे.
यापूर्वी भाजप सोडून गेलेले किंवा भाजपपासून मुद्दाम दूर राहिलेले नेते, कार्यकर्ते यांना जर पुन्हा पक्षात आणले गेले तर मतांचे प्रमाण वाढेल, असे दामू नाईक यांना वाटते. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा परिणाम गोव्यातही होत असतो. तरीदेखील गोव्यात काँग्रेसची ३० टक्के मते आहेत. काँग्रेसला कधी २८, कधी ३० तर कधी ३२ टक्के मते प्राप्त होतात. दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचा उमेदवार जिंकला. विधानसभा निवडणुकीवेळी जरी काँग्रेसला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरी, मतांच्या प्रमाणात जास्त फरक आलेला नाही. अल्पसंख्यांकांची मते काँग्रेसला प्राप्त होतात, तशीच हिंदूंचीही मते काही प्रमाणात काँग्रेसकडे वळतात.
२०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी तर हिंदूंचीच जास्त मते काँग्रेसने मिळवली होती. आरजीला लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसची जास्त मते फोडता आली नाहीत. भाजपने आपल्या सदस्यांची, समर्थकांची संख्या गोव्यात वाढवलेली आहे. बहुतांश उद्योजकदेखील भाजपसोबत आहेत. व्यापारी वर्ग भाजपची साथ देत सुरक्षित राहू पाहतोय. त्यामुळे भाजपची मते वाढू शकतात. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आता तसा जास्त वेळ नाही. दिगंबर कामत मंत्री झाल्यापासून दामू नाईक यांच्या उत्साहात भर पडली आहे. कामत यांना लवकर मंत्रिपद द्यावे, असे दामूंना वाटत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मात्र तसे वाटत नव्हते. कामत यांनी सभापतिपद स्वीकारावे अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. दामू नाईक यांना कदाचित वाटत असावे की दिगंबर मंत्री झाल्याने सासष्टीत विजय सरदेसाई यांचे वजन वाढू शकणार नाही. दिगंबर कामत यांच्यामुळे विजयची शक्ती फातोर्ड्यातून कमी होईल, असे दामूंना वाटणे स्वाभाविक आहे.
दामू नाईक हे २०२७ ची निवडणूक स्वतः लढतील काय? दामूंनी मला मागे एकदा सांगितले होते की त्यांना पूर्ण गोव्यात प्रचारासाठी फिरावे लागेल. त्यामुळे ते फातोर्ड्यातून लढणार नाहीत. मात्र २०२७ च्या निवडणुकीवेळी जसे वातावरण तयार होईल, त्या पद्धतीने कदाचित दामू निर्णय घेतील. दिगंबर कामत मंत्री झाले ही विजयसाठी आनंददायी गोष्ट नाही. मात्र कामत आपल्या मडगाव मतदारसंघाच्या पलिकडे प्रभावशाली नाहीत. कामत म्हणजे बाबूश मोन्सेरात नव्हेत आणि कामत म्हणजे विश्वजित राणेही नव्हेत. राणे व बाबूशकडे प्रत्येकी दोन मतदारसंघ आहेत. मायकल लोबोंकडेही दोन जागा आहेत. कामत यांनी कायम मडगावच सांभाळला आहे.
आता विषय येतोय, तो विजयच्या संकल्पाचा. विजय सरदेसाई यांनी आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला होता. त्याच पद्धतीने दामू नाईकांनाही आपल्या बर्थ डेचा आवाका व देखावा यावेळी जबरदस्त वाढवला. विजयला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. सध्या ते काँग्रेस पक्षावर दबाव येण्यासाठी गोवा फॉरवर्डचा प्रभाव वाढवत आहेत. विजयने विधानसभा अधिवेशनापूर्वी लोकांना भेटून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयोग केला होता. तो यशस्वी झाला. विजयला त्यात यश आले. त्यामुळेच विधानसभेत ते प्रभावी कामगिरी करू शकले. आता पुन्हा गणेश चतुर्थीवेळीदेखील सरदेसाई यांनी हिंदू बहुजनांच्या घरी जास्त प्रमाणात जाणे पसंत केले. उत्तर गोव्यातही भंडारी समाजातील अनेक लोकांच्या घरी विजय गेले. बार्देश, पेडणे, डिचोली अशा तालुक्यांत विजय फिरले. आपला संपर्क व कार्यकर्त्यांची संख्या सरदेसाई वाढवू पाहात आहेत. यातून निश्चितच काँग्रेसवर दबाव येईल.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी विजयची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. सरदेसाई आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार नाहीत. तसे करणे हा आत्मघात ठरेल, असे विजय यांनाच वाटते. काँग्रेसमध्ये जाऊन मोठे होता येणार नाही तर आपल्याच पक्षासोबत राहून काँग्रेसच्या साथीने आपण मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकू, असे विजयना कदाचित वाटत असावे. २०२७ ची निवडणूक विजय सरदेसाई यांच्यासाठी जिंकू किंवा मरू अशी अटीतटीची असेल. काँग्रेससाठीही ही अस्तित्वाची लढाई होईल.
समजा २०२७ साली काँग्रेस पुन्हा पराभूत झाला तर हा पक्ष मग आणखी दहा वर्षे पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. विजयला हे ठाऊक असावे. त्यामुळेही विजय काँग्रेसमध्ये जाणार नाहीतच. आम आदमी पक्ष वगैरे काँग्रेससोबत राहू पाहत नाही. सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष एकटाच भाजपला टक्कर देऊ शकत नाही. काँग्रेसची साथ मिळाली तरच ते शक्य होईल. आपण मुख्यमंत्री झालो तर आपण गोव्यात (मुरगावमध्ये) कोळसा वाहतूक बंद करू असे विजयने नुकतेच जाहीर केले. विजयला वाटते की सर्व विरोधकांनी एक होऊन भाजपला हरवावे, तर दामू नाईकांना वाटते की भाजपने ५१ टक्के मते प्राप्त करावीत. आता दामूंचे स्वप्न पूर्ण होईल की विजयचे स्वप्न साकार होईल, हे पुढील दीड वर्षात कळून येईलच.
लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर गोव्यात ५५ ते ६० टक्के मते मिळतात, पण विधानसभा निवडणुकीत ही मते घटतात. गोव्यात भाजपची ३४ ते ३५ टक्के मते आहेत, तर काँग्रेसकडे ३० टक्के मते आहेत. १९८० नंतर एकदाही काँग्रेसला ४० टक्के मते घेता आलेली नाहीत. भाजपला जर ५१ टक्के मते मिळवायची असतील तर आणखी १६ टक्के मते वाढवावी लागतील. याबाबत येत्या झेडपी निवडणुकीतच सत्य काय आहे ते कळून येईल. दामू नाईक यांच्या नेतृत्वाची ती पहिली मोठी कसोटी असेल.