पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर धारेवर धरण्यासाठी अपक्ष आमदारांनी विरोधी काँग्रेसबरोबर केलेला समन्वय पुढील काळातही सत्ताधाऱ्यांना गारद करण्यास पुरेसा ठरणार आहे. सरकारने अल्पकालीन अधिवेशन घेतल्याने महत्त्वाचे विषय मांडण्याचे राहून गेले, अशी तक्रार आता विरोधकांकडून येऊ लागली आहे. कमीत कमी दहा दिवसांचे अधिवेशन असावे, अशा मागणीचे पत्र लवकरच विरोधी पक्षनेत्यांकडून सभापतींना जाणार आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे म्हणाले की, अधिवेशन कमीत कमी दहा दिवसांचे तरी असायला हवे. पक्षाच्या सर्व आमदारांचे तसे म्हणणे आहे आणि विरोधी पक्षनेते तशी मागणी सभापतींकडे करणार आहेत. कमी वेळ मिळाल्याने अनेक विषय मांडता आले नाहीत. सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. वीज बिलांचा घोळ होता, आता पाणी बिलेही भरमसाट येऊ लागली आहेत. पेट्रोलवरील व्हॅट १0 टक्क्यांनी वाढवला. बेकायदा भूखंड करून विकण्याचे स्वैर प्रकार घडताहेत. आरोग्य क्षेत्रात तर बजबजपुरी माजलेली आहे. या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा आवश्यक होती. जनतेचे मुद्दे मांडण्याचे काम विरोधी काँग्रेसी आमदारांबरोबर अपक्षांनीही या वेळी प्रभावीपणे केले. विरोधक असेच एकत्र राहिल्यास सरकारच्या त्रुटी दाखवून देता येतील. अपक्ष आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, या अधिवेशनात कमी वेळ मिळाला ही गोष्ट खरीच. गोमंतकीयांना नोकऱ्यांमध्ये ८0 टक्के राखीवता मिळावी म्हणून खासगी ठराव दाखल केला होता तो आलाच नाही, तसेच कृषी जमीन परप्रांतीयांना विकण्यास मनाई करण्याची तरतूद असलेले खासगी विधेयक दिले होते तेही कामकाजात घेतले नाही.(पान २ वर)
काँग्रेसला अपक्षांचे ‘बळ’
By admin | Updated: March 30, 2015 01:27 IST