वासुदेव पागी, पणजी: लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष भाजपचा प्रचार शिगेला पोहोचला असताना कॉंग्रेस उमेदवार कधी जाहीर करणार ही कार्यकर्त्यांची उत्कंठा आणि प्रतिक्षाही संपली आहे. उत्तर गोव्यात माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यात विरियातो फर्नांडीस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विरियातो फर्नांडीस लोकसभेसाठी दक्षिणेत नवीन चेहरा असला तरी २०२२ ची विधानसभा निवडणूक त्यांनी दाबोळी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. माविन यांच्याकडून त्यांना १५७० मतांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यांनी आपले काम चालूच ठेवले. सरकारविरोधात पत्रकार परिषदा घेऊन अनेक विषयांवर आवाज उठविला होता. यावेळी लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची आधीपासूनच चर्चा सुरू होती आणि ते इच्छुकही होते.
पक्षाचे दक्षिणेचे उमेदवार माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी या अगोदरही लोकसभेच्या निवडणुका लढविल्या आहेत. १९९० मध्ये ते केंद्रात कायदामंत्री होते. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या मंत्रीमंडळात व नंतर इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात त्यानी काम केले आहे.
कॉंग्रेसच्या उमेदवारांचा गुंता हा बराच काळ रेंगाळला होता. उमेदवार केव्हा घोषित केले जातील असे प्रश्न सातत्याने कार्यकर्ते पक्षनेतृत्वाला विचारीत होते आणि पत्रकारही विचारीत होते. पत्रकारांच्या अशाच एका प्रश्नला उत्तर देताना पक्षाचे नेते व इच्छुक उमेदवार विजय भिके यांनी उमेदवार गुढीपाडव्याला जाहीर केले जातील असे सांगितले होते. मात्र कॉंग्रेसने उमेदवारांची गुढी गुढीपाढव्याच्या दोन दिवस अगोदरच उभारली म्हणावी लागेल.