लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यात अनधिकृत बांधकामांना कायदेशीर करण्याचे सरकार दरबारी प्रयत्न सुरू असताना कोमुनिदादींनी आक्रमक पवित्रा घेत त्याला विरोध केला. याच पार्श्वभूमीवर चिळकोणा-बोगमाळो येथील सर्व्हे क्रमांक ४/१ मधील १९ बांधकामे पाडण्यासंदर्भात आदेश काढला आहे. न्यायालयीन आदेशानंतर दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासनाने कारवाईचा आदेश जारी केला आहे.
बोगमाळो कोमुनिदादच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक ४/१ मध्ये बेकायदा बंगले उभारण्यात आले आहेत. संबंधितांनी तत्काळ बंगले खाली करावेत अन्यथा ते पाडण्यात येतील, असा आदेश द. गो. कोमुनिदाद प्रशासकांनी जारी केला असून फ्रेंड्स कॉलनीमधील बांधकामांवर बुलडोझर फिरणे अटळ आहे. या ठिकाणी जवळपास १९ बेकायदा बांधकामे असून ती पाडण्यात येतील, असा आदेश २१ जुलै रोजी दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक प्रजित चोडणकर यांनी जारी केला होता.
राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे कोमुनिदाद जागेवर ही बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आल्याची चर्चा मुरगाव तालुक्यात सुरू आहे. संबंधित भूखंड जवळच्या व्यक्तींना देण्यात आले आहेत. मात्र, दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी ती घरे पाडण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतर आता रहिवाशांची मात्र पाचावर धारण बसली आहे.
या कोमुनिदाद प्रशासकांनी कारवाईसाठी खंडपीठाकडे अतिरिक्त १२ आठवड्यांची मुदत मागितली होती. ती मंजूर झाल्यानंतर काही काळ कारवाईला स्थगिती मिळाली. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावर अखेर २१ जुलै रोजी प्रशासक प्रजित चोडणकर यांनी संबंधित १९ बांधकामे त्वरित रिकामी करावी अन्यथा ती पाडण्यात येतील असे आदेश दिले आहेत.
फोरम अगेस्ट करप्शन इललिगेलिटी अॅण्ड डिस्टिक्शन या संस्थेचे संजय म्हाळसेकर आणि रुई आरावेझो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने बांधकामे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. खंडपीठाने ही बांधकामे आठ दिवसांत पाडण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व कोमुनिदाद प्रशासकांना दिले आहेत.