लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात तीन पाकिस्तानी 'शॉर्ट टर्म' व्हिसावर होते, त्यांना गोवा सोडण्याचा आदेश दिला आहे. १७पाकिस्तानी पाच वर्षांच्या दीर्घ व्हिसावर गोव्यात वास्तव्य करत असून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर राहील. आज, शनिवारपासून राज्यात 'कोंबिंग ऑपरेशन' सुरू होणार असून गोव्यात येणारे परप्रांतीय, भाडेकरूंची कसून तपासणी केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.
पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढून ४८ तासात देश सोडायला लावा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. सावंत यांनाही शाह यांनी फोन केला त्यानंतर त्यांनी काल सायंकाळी वरिष्ठ पोलिस अधिकारी, दोन्ही जिल्हाधिकारी, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसेच नौदलाचे अधिकारी यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. मुख्य सचिव व्ही. कांडावेलू हेही उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, रेल्वे स्थानके, बसस्थानके, विमानतळांवरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पर्यटनस्थळे तसेच आठवडी बाजार वगैरे गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त रात्रीच्यावेळी गस्ती वाढवल्या जातील. सर्व जेटींवरही बंदोबस्त ठेवला जाईल. आयआरबी पोलिस नाकाबंदीसाठी असतील. गोव्यात येणारे परप्रांतीय तसेच भाडेकरूंनी पोलिसांना सहकार्य करावे. आधार कार्ड, मतदार कार्ड वगैरे पोलिसांनी मागितल्यास ते सादर करावे. कोणीही सोशल मीडियावरील व्देषमूलक किंवा चिथावणी देणारे पोस्ट टाकू नयेत यासाठी करडी नजर ठेवली जाईल. लोकांनी जातीय सलोखा बिघडवू न देता शांतीने रहावे.
पहलगाम दहशतवादी हल्याचा कडक शब्दात निषेध करताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्रालयाची अॅडव्हायझरीचे पालन करावे. काश्मिरी विद्यार्थी, नागरिकांनी पोलिसांकडे संपर्क साधल्यास त्यांना संरक्षण दिले जाईल.
अपघात नियंत्रणात आणण्यासाठी हाती घ्यावयाच्या उपाययोजना तसेच चेक नाक्यांवरील तपासणीसह वाहतूक क्षेत्रातील विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी अन्य एक बैठक घेऊन आढावा घेतला. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस वाहतूक खात्याचे अधिकारी, वरिष्ठ पोलिस, आयटी अधिकारी तसेच इन्फोटॅक महामंडळाच्या अधिकाग्रांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत महत्त्वाचे निर्देश दिले.
डेडलाईन जारी
२६ एप्रिल : राजनैतिक व दीर्घकालीन व्हिसावर असलेल्यांव्यतिरिक्त कोणाही पाकिस्तानी नागरिकाला गोव्यात राहता येणार नाही. १६ वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा आहेत. सार्क व्हिसावर असलेल्या पाक नागरिकांना भारत देश सोडण्यासाठी आज २६ पर्यंत मुदत आहे.
२७ एप्रिल : व्हिसा ऑन अरायव्हल, बिझनेस, फिल्म, पत्रकार, ट्रान्सिट, कॉन्फरन्स, गिर्यारोहण, विद्यार्थी, व्हिजीटर, ग्रुप टुरिस्ट, तीर्थयात्रा, पाक अल्पसंख्यांक भाविक गट आदी प्रकारच्या व्हिसावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी उद्या २७ पर्यंत भारत सोडावा लागेल.
२९ एप्रिल : वैद्यकीय व्हिसावर असलेल्या पाकिस्तानींना मंगळवार २९ पर्यंत देश सोडावा लागेल. केवळ राजनैतिक व अधिकारी तसेच दीर्घकालीन व्हिसावर असलेल्या पाकिस्तानींनाच राहता येईल.
अपघात नियंत्रणात आणण्यासाठी हाती घ्यावयाच्या उपाययोजना तसेच चेक नाक्यांवरील तपासणीसह वाहतूक क्षेत्रातील विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी अन्य एक बैठक घेऊन आढावा घेतला.