पणजी : ‘तुम्ही उन्हात बसून काळ्या व्हाल. मग तुम्हाला लग्नासाठी वरदेखील मिळू शकणार नाही,’ अशा प्रकारचे गंभीर विधान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केल्याचा दावा १०८ रुग्णवाहिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पार्सेकर यांच्याविषयी मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का पोहोचला आहे. मात्र, आपण अशा प्रकारचे अपशब्द वापरले नसल्याचे पार्सेकर यांचे म्हणणे आहे.१०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी महिनाभर आंदोलन करत आहेत. आझाद मैदानावर उन्हात बसून त्यांनी धरणे धरले आहे. यापूर्वी आंदोलन करणाऱ्या अकराजणांना इएमआरआय या कंपनीच्या व्यवस्थापनाने सेवेतून बडतर्फ केले आहे. मुख्यमंत्री जिथे जिथे सार्वजनिक कार्यक्रमासाठी जातील, तिथे त्यांना घेराव घालण्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांनी ठरविले आहे. मुख्यमंत्री मंगळवारी उसगाव-धारबांदोडा येथे एका कार्यक्रमास गेले असता, तिथे १०८ रुग्णवाहिका सेवेचे पुरुष व महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना भेटले. तिथे त्यांच्याशी चर्चा झाली. तुम्ही उन्हात बसून काळ्या व्हाल, अशा प्रकारचे विधान तेथील महिला कर्मचाऱ्यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी केले व वादाची ठिणगी पडली.मुख्यमंत्री पार्सेकर यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांसमोर बाजू मांडली. आपण १०८ सेवेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्याचा यापूर्वी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी धारबांदोडा-उसगाव येथे घेराव घातला नाही, आपणच त्यांना चर्चेसाठी एका खोलीत बोलावले. इंजिनिअर असलेली एक महिला कर्मचारीही त्या वेळी आंदोलकांमध्ये होती. त्या खोलीत हायरसेकंडरीचे काही शिक्षक, तसेच आमदार गणेश गावकरही होते. तुमचे काय झाले आहे, तुम्ही उन्हात बसून तुमची काय दशा झाली आहे ते पाहा, असे आपण म्हणालो; कारण मला त्या महिला कर्मचाऱ्यांची व इतरांची दया आली. मात्र, तुमचे लग्न होणार नाही, तुम्हाला नवरा मिळणार नाही, वगैरे वाक्ये आपण वापरलीच नाही. तशी भाषा आपण केलेली नाही, हे ती इंजिनिअर असलेली महिला कर्मचारीही सांगेल, असे पार्सेकर म्हणाले. पणजीत बसणाऱ्या आंदोलकांच्या नेत्यांनी उगाच वाट्टेल ती वाक्ये आपल्या तोंडात घातली आहेत. आपण जे बोललोच नाही, ते आपण बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून आपल्याला हे स्पष्टीकरण करावे लागत आहे. (खास प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली!
By admin | Updated: April 2, 2015 02:09 IST