लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'लोकमत'ने सोमवारी दिलेल्या बातमीने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा घडून आली. राज्यभर त्याविषयी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सोमवारी सायंकाळी सविस्तर भाष्य केले. मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय सध्या आलेला नाही, जेव्हा कधी तो येईल तेव्हा पक्षाचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करील. केंद्रीय नेतृत्व योग्यवेळी योग्य निर्णय घेईल, असे तानावडे यांनी जाहीर केले.
तानावडे म्हणाले, की सरकारमध्ये नेतृत्व बदलाचा विषय आलेला नाही. मंत्रिमंडळ फेररचनेचा विषयही आलेला नाही. सध्या तसे काही नाही. अनेकजण फोन करून त्याविषयी विचारतात, त्या केवळ अफवा आहेत.
तानावडे म्हणाले की, प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीत कुणी बोलावले होते हा प्रश्न आहे. त्यांना बोलावले नव्हते. समजा एखादा विषय भविष्यात आलाच तर केंद्रीय नेते गोव्यात येतील, ते चर्चा करतील. शेवटी भाजपची एक प्रक्रिया असते. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेत सध्या तरी तथ्य नाही. लिडरशीप बदलण्याबाबत सध्या तरी विषय चर्चेत आलेला नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल हे स्पष्ट असल्याचे पक्ष सूत्रांकडून कळते. मात्र या विषयावर आता मुख्यमंत्री सावंत किंवा प्रदेशाध्यक्ष तानावडे बोलणे टाळतात. प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीला बोलावले आहे, असा निरोप कुणी दिला होता? याचा शोध सध्या भाजपचे काही नेते घेत आहेत.
सध्या बदल नाही
तानावडे म्हणाले की मंत्री विश्वजीत राणे हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. ते पंतप्रधानांना भेटले यात राजकारण काही नाही. केंद्रीय मंत्र्यांनाही विश्वजीत भेटले यात गैर काही नाही. मुख्यमंत्र्यांसोबत नुकतेच तीन आमदार राजस्थानला जाऊन आले. त्यातही चुकीचे काही नाही. त्यात राजकारण कसलेच नाही. गोव्यात सध्या कसल्याच प्रकारच्या बदलाचा विषय नाही.