पणजी : चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डचे प्रमाणपत्र हा अंतिम कायदाच ठरावा, अशा प्रकारची तरतूद सरकारने करायला हवी, असा आग्रह निर्माते, दिग्दर्शक करण जोहर यांनी धरला. इफ्फीनिमित्त करण जोहर गोव्यात आले आहेत. एनएफडीसीच्या फिल्म बाजारावेळी सोमवारी जोहर यांनी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. सेन्सॉर बोर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जे चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकतात, त्यांतील दृश्यांना किंवा संवादांना काही संघटनांकडून आक्षेप घेण्याचे प्रकार वाढले आहेत. काही सिनेमांच्या प्रदर्शनांनाही जोरदार विरोध होतो. या पार्श्वभूमीवर करण जोहर यांनी आपली भूमिका मांडली. सेन्सॉरशीप हा अंतिम कायदा आहे, असे सध्याच्या केंद्र सरकारने ठरवायला हवे. त्यासाठीची कायदेशीर तरतूद करायला हवी. एकदा एखाद्या सिनेमाला सेन्सर बोर्डचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तेच अंतिम मानले जायला हवे. तसे झाले नाही, तर सिने निर्माते टार्गेट होत राहतील, असे जोहर यांनी नमूद केले. निर्मात्याची चित्रपटाप्रती जबाबदारी हा नाजूक विषय आहे. सध्याच्या स्थितीत आम्ही जास्तच जागरूक राहायला हवे. युवा सिने निर्माता या नात्याने मी थोडा कमी जबाबदार होतो. त्यामुळे सिनेमा काढल्यानंतर मला काही वेळा माफीही मागावी लागत होती, असे जोहर म्हणाले. (खास प्रतिनिधी)
सेन्सॉरशीप हा अंतिम कायदा असावा!
By admin | Updated: November 25, 2014 01:25 IST