लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कॅब अॅग्रिगेटरवरून वाद सुरू असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत कॅब अॅग्रिगेटर लागू करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी राज्यातील सर्व टॅक्सीचालक, टॅक्सी संघटना तसेच स्थानिक टॅक्सीमालकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
येत्या २० ते २५ ऑगस्ट दरम्यान वाहतूक खाते, टॅक्सी संघटना, टॅक्सीचालक सर्वाना एकत्र घेऊन याबाबत बैठक घेतली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमदार वेंझी व्हिएगस यांनी शून्य तासावेळी हा मुद्द उपस्थित केला होता. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही अधिवेशनात हे आश्वासन दिले आहे. त्यामुळे फसविण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही टॅक्सीचालकांना विश्वासात घेतल्याशिवाय टॅक्सीचालकांवर नवीन अॅप लादणार नाही.
गोवेकरांना परवडणाऱ्या दरात मासे उपलब्ध करून देण्यासाठी येत्या सहा महिन्यांत एक योजना बनविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्यात सध्या मासळीचा पुरवठा कमी झाल्यामुळे मासळीचे दर भडकले आहेत. त्यातही गोव्यात पकडलेली मासळी इतर राज्यात पाठविली जाते. यावर सरकारने काही तरी तोडगा काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तशी योजना बनविण्यात येईल, असे सांगितले.
आम्हाला वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिलेले आश्वासन मान्य नाही. त्यामुळे टॅक्सी अॅप लागू करणार की नाही याचे स्पष्टीकरण अधिवेशनात द्यावे. जोपर्यंत आम्हाला विधानसभेत आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूकमंत्र्यांनी याविषयी स्पष्टीकरण न देता मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही विरोधकांना तसेच टॅक्सीचालकांना सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहे. - वेंझी व्हिएगस, आमदार