पणजी : औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे आग्वाद तुरुंगातील एका कैद्याला बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावे लागले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तुरुंग प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली. कैदी सुरेश जाधव हा आजारी असल्यामुळे औषधे घेत होता. गोळ्या घेतल्यावर त्याला चक्कर आली व तो खाली कोसळला. त्यानंतर तातडीने गोमेकॉत दाखल करण्यात आले. गोमेकॉतील डॉक्टरांकडून दिलेल्या माहितीनुसार, कैद्याची प्रकृती शनिवारी व रविवारी अत्यंत बिकट होती. सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे; परंतु अद्याप स्थिर झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात तपास करणाऱ्या कळंगुट पोलिसांची पंचाईत झाली आहे. कैद्याची जबानी घेण्यासाठी डॉक्टरांनी परवानगी न दिल्यामुळे हवालदाराला परत जावे लागले. (प्रतिनिधी)
गोळ्यांच्या अतिसेवनाने ‘आग्वाद’चा कैदी अत्यवस्थ
By admin | Updated: October 7, 2014 01:42 IST