ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ४ - गोव्यात भाजपचा आम आदमी पार्टीशी गांधर्व विवाह झाल्याचा टोमणा वजा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी केला.
आपमुळे गोव्यात भाजपला फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात म्हटले होते. हे वक्तव्य म्हणजे "आप" चा या पक्षाशी असलेल्या छुप्या संबंधांची दिलेली अप्रत्यक्ष कबुली असल्याचे डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
ते म्हणाले की सत्ता मिळविण्यासाठी भाजपने मागच्यावेळी मगो पक्षाशी हात मिळवणी केली होती. यावेळी हा पक्ष "आप"शी हातमिळवणी करीत आहे आणि ती ही अनैतिक. गोव्यात "आप" पक्ष हा भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठीच करण्यात आला आहे. यापूर्वीही लोकसभा निवडणुकीत आपने ते काम केलेले आहे.
येत्या निवडणुकीतही त्यांना ही कामगिरी बजावण्यासाठी भाजप त्यांना पैसे पुरवीत असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच आपमध्ये कार्यरत असलेली मंडळी ही राष्टीय स्वयंसेवक संघातील असल्याचेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीत "आप"च्या उमेदवार असलेल्या स्वाती केरकर, आणि अविनाश तावारीस व नीळकंठ गावस हे पूर्वीचे आप नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.