लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : भाजपची खरी ओळख ही समाजसेवक अशीच आहे. आम्ही निवडणुका तोंडावर असताना काम करत नाही. ३६५ दिवस भाजप पक्ष लोकांच्या हितार्थ काम करतो, म्हणूनच हा पक्ष जनसामान्यांचा पक्ष बनला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सावर्डे मतदारसंघ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
त्यांच्याबरोबर सावर्डेचे आमदार गणेश गावकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार विनय तेंडूलकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सर्वानंद भगत, दक्षिण गोव्याचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, सावर्डे भाजप मंडळ अध्यक्ष कपिल नाईक, सरपंच संजना नार्वेकर, बालाजी गावस, सुहास गावकर, गोविंद शिगावकर, नरेंद्र गावकर व चिन्मयी नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय व आम्ही तृतीय' या सूत्रानुसार भाजप कार्यकर्ते काम करतात. आम्हाला सत्ता हवी असते, ती देशाच्या सुरक्षेसाठी, लोकसेवेसाठीच. घराणेशाहीच्या मुद्द्यावर त्यांनी आतापर्यंत राजकारण केले. परंतु, त्यांच्या घराण्यातील एकही माणूस पंतप्रधान होणार नाही, याची काळजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे, कारण आम्ही लोकशाही मानतो घराणेशाही नाही.
'एकही योजना बंद पडणार नाही'
प्रत्येक घरात वीज, वीमा, मोफत राशन, आरोग्यसेवा देण्याचे काम डबल इंजिन सरकारने करून दाखवले आहे. आगामी काळात हर घर इंटरनेट देण्याचे आमचे स्वप्न आहे. भाजप सरकारने ज्या योजना आतापर्यंत दिलेल्या आहेत, त्यातील एकही भविष्यात बंद पडणार नाही. उलट त्यामध्ये प्रत्येक वर्षी नव्या योजनांची भर पडेल. प्रत्येक माणसाला नोकरी मिळणे आवश्यक आहे. सरकारी असो किंवा खाजगी, प्रत्येकाला नोकरी मिळेल याची तजवीज आम्ही केली आहे. ज्यांना व्यवसायात करायचा आहे, त्यांच्यासाठी पूरक असे औद्योगिक व व्यावसायिक वातावरण आम्ही निर्माण केले आहे.
सावर्डे पर्यटनाचा रोड मॅप तयार
मुख्यमंत्री म्हणाले की, सावर्डे मतदारसंघात खनिज व्यवसायबरोबरच पर्यटन क्षेत्राचाही विकास होणार आहे. अतिदुर्गम भागातील पर्यटनावर भर देत रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. त्यासाठी सुविधांनाची निर्मिती होत आहे. जास्तीत जास्त पर्यटक सावर्डे मतदारसंघात यावे, यासाठी रोड मॅप तयार होत आहे. सावर्डे मतदारसंघात शैक्षणिक क्रांती झालेली आहे. एक शैक्षणिक हब मतदारसंघ विकसित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य म्हणून सावर्डे करणार आहे. शैक्षणिक आस्थापनांच्या माध्यमातूनही रोजगार निर्माण होतील. कृषी, हॉर्टिकल्चर, पशुसंवर्धन क्षेत्रातील अनेक मोठे प्रकल्प सावर्डे मतदारसंघात येणार आहेत. त्यासाठी आमदार गणेश गावकर चांगले काम करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ऑक्टोबरपासून खनिज ई-लिलावाला वेग
मुख्यमंत्री म्हणाले, की सावर्डे मतदारसंघात खनिज व्यवसाय बंद झाला. त्यात आमची चूक नाही. त्यासंदर्भात झालेल्या आंदोलनात मीसुद्धा सहभागी झालो होतो. मीसुद्धा लाठ्या खाल्ल्या आहेत. खनिज संदर्भात पुन्हा आंदोलन झाले, तरीही मी लोकांसोबतच राहणार आहे. खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात, काही लिजचे नूतनीकरण झाले आहे. आगामी काळात राज्यातील खनिज व्यवसाय सुरू राहणार आहे. ऑक्टोबरपासून ई-लिलाव प्रक्रिया नव्या जोमात सुरू होत आहे. प्रायव्हेट डम्प पॉलिसिच्या माध्यमातून व्यवसाय कधीच बंद होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत.