पणजी - गोव्यातील लाखो लोकांवर प्रतिकूल परिणाम करणा-या खाण प्रश्नावरील मौन भाजपने सोडावे, असे मत गोवा शिवसेनेने व्यक्त केले आहे.
खाण उद्योगातील सध्याचा पेचप्रसंग सोडविण्यात सरकारला अपयश आले तर गोवा फॉरवर्ड आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका गोवा फॉरवर्डने घेतली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरील भाजपच्या मौनामुळे आघाडीतील घटक पक्षांमधेच अस्वस्थता असल्याचे यातून प्रतिबिंबित होते, असे उपाध्यक्ष राखी प्रभुदेसाई नाईक यांनी म्हटले आहे.
नाईक म्हणतात की, सध्या भाजप दिशाहीन झालेला असल्याने तो या प्रश्नावर मौन बाळगून अनिश्चितता कायम ठेवील, अशी आमची अटकळ होतीच. राज्यातील परिस्थितीशी भाजपला काहीही देणेघेणे नाही.
खाण उद्योग पूर्ववत सुरू करण्यात सरकारला सतत येत असलेले अपयश आणि त्याची अकार्यक्षमता यामुळे खाण पटट्यातील लोकांमधे उदासीनता पसरली आहे. खाण उद्योगाच्या सद्य:स्थितीला केवळ आणि केवळ भाजपच जबाबदार आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे. त्या पुढे म्हणतात, की खाण उद्योग २०१२ सालापर्यंत व्यवस्थित चालू होता; पण भाजप सत्तेवर आल्यापासून सगळे अडथळे त्याच्यापुढे निर्माण झाले यावरूनच या उद्योगासंबंधातील भाजपचा दोष ठळकपणे दिसतो. या उद्योगावर अवलंबून असणा-या लोकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्नच झालेले नाहीत.
गोवा फॉरवर्डने प्रत्यक्ष कृती करून सरकारमधून बाहेर पडावे. या पक्षाने लोकांना गृहित धरू नये आणि खाण उद्योगाचा राजकीय स्वाथार्साठी उपयोग करू नये, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.