पणजी : महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी नाकारलेले तिघे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गळाला लागले आहेत. खुद्द महापौर शुभम चोडणकर यांना प्रभाग क्रमांक २७ मध्ये देवेंद्र कुंडईकर यांनी आव्हान दिले असून आजवर भाजपसाठी काम केलेले कुंडईकर आता बाबूश पॅनलमधून चोडणकर यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. प्रभाग २४ मध्ये दीपक म्हापसेकर यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर सागर च्यारी यांना बाबूश यांनी तिकीट दिले आहे, तर प्रभाग १२ मध्ये भाजप बंडखोर मनोज पाटील बाबूश पॅनलमधून निवडणूक लढविणार आहेत. रविवारी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपसाठी इच्छुक उमेदवारांशी समोरासमोर चर्चा केली. पर्रीकर यांनी तिकीट नाकारलेल्यांकडे बाबूश यांनी संपर्क साधून त्यांना गळाला लावले. प्रभाग १२ मध्ये आजवर भाजपसाठी काम केलेले मनोज पाटील हे बाबूश यांच्या पॅनलमधून वैदेही नायक यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आहेत. बाबूश मोन्सेरात यांनी उर्वरित आठ उमेदवारांची यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर केली. प्रभाग ९ मधून रुथ फुर्तादो व प्रभाग १0 मधून सुरेंद्र फुर्तादो, प्रभाग १५ मधून संदीप वामन नाईक, प्रभाग २२ मधून अविनाश भोसले, तर प्रभाग २५ मध्ये सलील बबन नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापौर शुभम चोडणकर यांच्या प्रभागात देवेंद्र कुंडईकर यांनी उमेदवारीसाठी दावा सांगितला होता. आपल्याला खुद्द पर्रीकर यांनीच तिकिटाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे उमेदवारी मिळायला हवी, असा पवित्रा कुंडईकर यांनी घेतला होता; परंतु त्यांना भाजपने तिकीट नाकारले. मनोज पाटील हेही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते. ते आता बाबूशच्या पॅनलमधून मतदारांसमोर जाणार आहेत. प्रभाग २३ मध्ये अजून उमेदवार निश्चित झालेला नाही. या प्रभागात तीन नावे आली असून लवकरच उमेदवार निश्चित होईल. (प्रतिनिधी)
भाजपचे तीन बंडखोर बाबूशच्या गोटात
By admin | Updated: February 3, 2016 02:53 IST