लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपमध्ये आता मंडळ अध्यक्षांसाठी ४५ वर्षे कमाल वयोमर्यादेची अट लागू झाली आहे. तसेच भाजपच्या जिल्हा अध्यक्षांसाठी ६० वर्षे कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आली आहे. यामुळेच गोव्यातील भाजपमध्ये धावपळ उडाली आहे.
वयाबाबत आता तडजोड करता येणार नसल्याने भाजपला सर्व मतदारसंघांमध्ये आपले नवे मंडळ अध्यक्ष आता ४५ वर्षांहून कमी वयाचे निवडून आणावे लागतील. उपाध्यक्ष किंवा सचिव, सरचिटणीस यांना वयोमर्यादा नाही. मात्र मंडळ अध्यक्ष हा ४५ वर्षांहून अधिक वयाचा करता येणार नाही. भाजपने प्रदेशाध्यक्ष पदासाठी मात्र अजून वयाची अट लागू केलेली नाही.
प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना 'लोकमत'ने विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला. होय, मंडळ अध्यक्षपदी आता ४५ वर्षांहून अधिक वयाचा कार्यकर्ता नियुक्त करता येणार नाही. जिल्हा अध्यक्ष हा ६० वर्षांहून वरचा नसेल. जिल्हा स्तरीय उपाध्यक्ष किंवा सचिवांना वगैरे वयाची अट नाही. तानावडे म्हणाले, की आपण दिल्लीत दाखल झालो आहे, कारण रविवारी पक्ष संघटनेबाबतच बैठक आहे. त्यावेळी भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत काही निर्णय दिल्लीत होतील. मग गोव्यात पक्षाचे निरीक्षक वगैरे पाठवून पुढील प्रक्रिया केली जाईल. गोव्यात भाजपची संघटनात्मक निवडणूक जानेवारीत होईल.