लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात असून मंत्रिमंडळ फेररचनेची जोरदार चर्चा असतानाच काल, मंगळवारी सायंकाळी काही मंत्री व सत्ताधारी तसेच अपक्ष आमदारांनी त्यांनी 'वन टू वन' भेट घेतली.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये त्यांना भेटले. संतोष यांनी आमदारांच्या मतदारसंघातील कामांबद्दल तसेच मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेतले. नेतृत्वबदल किंवा मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल संतोष यांच्याशी काही चर्चा झाली का? असे विचारले असता विश्वजीत म्हणाले की, तसे काही नव्हते. माझी केवळ सदिच्छा भेट होती. मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनीही कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले की, मंत्र्यांच्या कार्यक्षमतेबद्दल किंवा मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही.
संतोष यांनी तत्पुर्वी दुपारी ४ वाजता बांदोडा येथे महालक्ष्मी मंदिरात येत्या १३ व १४ रोजी गोव्यात होणार असलेल्या भाजप परिवाराच्या अ.भा. महिला समन्वय बैठकीच्या तयारीचा आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे तसेच प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. १३ व १४ रोजी बांदोडा येथे होणार असलेल्या बैठकीला भाजप, संघ तसेच परिवारातील अन्य मिळून ४५ महिला नेत्या उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनीही घेतली भेट
बी. एल. संतोष यांच्या आगमनानंतर मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. पत्रकारांनी संतोष यांना याबद्दल विचारले असता त्यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळत मौन पाळले. आज, बुधवारी ते दिल्लीला परतणार असून तत्पूर्वी काही आमदार, मंत्री त्यांची स्वतंत्रपणे भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत हे काल दोनवेळा बी. एल. संतोष यांना भेटले.
२०२७ मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढणार : आमदार चंद्रकांत शेट्ये
डॉ. शेट्ये हे अपक्ष आमदार असले तरी भाजपला अत्यंत निकट आहेत. २०२७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांचा भाजपप्रवेश होऊ शकतो अशा चर्चा आहेत. डॉ. शेट्येंना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मला पाच मिनिटे बोलायला मिळाले. माझ्या मतदारसंघाबद्दल त्यांनी जाणून घेतले. तसेच त्यांनी मतदारसंघात काम चालू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी पत्रकारांनी भाजपप्रवेश निकट आहे का? असे विचारले असता डॉ. शेट्ये म्हणाले की, मी २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपच्या तिकिटावरच रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे. पुढील काय ते भाजप नेतृत्वाने ठरवावे.