लोकमत न्यूज नेटवक, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल, बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. येत्या १० सप्टेंबरनंतर शाह गोव्यात येणार असून, त्याचवेळी मंत्रिमंडळातून कोणाला वगळावे किंवा कोणाचा समावेश करावा, हे ठरणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये काही मंत्र्यांचा 'मोरया' निश्चित मानला जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी कोणतेच भाष्य केले नाही.
गोवा भेटीत शाह यांच्याहस्ते राज्य सरकारच्या 'माझे घर' योजनेचे उद्घाटन होणार आहे. तारीख व कार्यक्रमाची वेळ लवकरच ठरविण्यात येणार आहे. याच दरम्यान मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. दोन किंवा तीन आमदारांचा समावेश होऊ शकतो व नवीन चेहरे दिले जाऊ शकतात, अशी माहिती मिळाली आहे. कदाचित शहा गोवा भेटीवर येऊन गेल्यानंतर लगेच बदल होतील, असे राजकीय सूत्रांनी सांगितले.
शाह यांची भेट घेण्यापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही भेटले. शाह यांनी मंत्री, तसेच सत्ताधारी आमदारांच्या कामगिरीबद्दल सावंत यांच्याकडून माहिती घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात मंत्र्यांनी कशा प्रकारे परफॉर्मन्स केला हेही शाह यांनी जाणून घेतले, असे राजकीय सुत्रांनी सांगितले. लोकमतने मुख्यमंत्र्यांना विचारले असता, अजून काही ठरलेले नाही एवढेच ते म्हणाले.
२०२७ ची विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने सरकारची प्रतिमा जपण्यासाठी मंत्रिमंडळात काही महत्त्वाचे फेरबदल करण्याचा ठाम निर्णय झालेला आहे. पक्षाच्या स्थानिक पातळीवरही प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलेले आहे. या रिपोर्ट कार्डबद्दल दामू यानी नड्डा यांना सविस्तर माहिती दिलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या 3 टप्प्यात दोन ते तीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. त्यासाठी दिगंबर कामत व रमेश तवडकर यांच्या नावांची चर्चा आहे. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांना डच्चू देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. सिक्वेरा हे आजारातून तसे अजून बरे झालेले नाहीत.
मंत्र्यांविषयी नाराजी आहेच...
काही मंत्र्यांच्या निष्क्रियतेवर सत्ताधारी आमदारांमध्ये नाराजी आहे. आमदार मायकल लोबो यांनी, तर विधानसभा अधिवेशनाचा हवाला देऊन काही मंत्री कामच करत नाहीत. त्यांच्या खात्यांबाबत विरोधी आमदारांकडून अडचणीत टाकणारे प्रश्न आले की, वारंवार मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागत होता, असा आरोप केला होता. भाजप कार्यकर्त्यांमध्येही काही मंत्र्यांकडून कामे होत नसल्याने नाराजी आहे.
शाह यांचे योजनेबद्दल गौरवोद्गार
'लोकमत'शी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अमित शाह यांना मी 'माझे घर' योजनेची माहिती दिली. त्यांना ही योजना आवडली. उद्घाटनासाठी १० सप्टेंबरनंतर गोव्यात येण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. या बाबतीत सविस्तर कार्यक्रम नंतर ठरणार आहे. यावेळी राजकीय चर्चेबद्दल विचारले असता, सावंत यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही.
काय आहे योजना...
अमित शाह यांच्याहस्ते उद्घाटन होणार असलेल्या 'माझे घर' योजनेच्या माध्यमातून सरकारने सामान्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे. घर दुरुस्तीसाठी तीन दिवसांत परवाना, एकाच घरात विभक्त राहणाऱ्या भावंडांना स्वतंत्र घर क्रमांक व त्या आधारे स्वतंत्र पाणी, वीज जोडणी, १९७२ पूर्वीची सर्वे प्लॅनवर लागलेली घरे नियमित करणे (एक लाखापेक्षा अधिक घरांना लाभ), कोमुनिदाद जमिनीतील अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी विधेयक संमत तसेच स्वतःच्या जागेत अनधिकृत घर बांधलेल्यांना ते कायदेशीर करण्यासाठी अर्ज सादर करण्यास आणखी दोन वर्षे दिलेली मुदतवाढ आदी गोष्टींचा यात समावेश आहे.