लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अॅड. अमित पालेकर हे येत्या शुक्रवारी, दि. १० रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या अॅड. पालेकर यांना गेल्या डिसेंबरमध्ये जि. प. निवडणुकीत पक्षाचा धुव्वा उडाल्यानंतर पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर दि. ५ जानेवारी रोजी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पालेकर यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी सांताक्रुझ मतदारसंघातील आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी आणि समर्थकांशी सविस्तर चर्चा केली. सांताक्रुझमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सातत्याने बैठका सुरू होत्या. अॅड. अमित पालेकर हे पेशाने वकील असून, फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने त्यांना सांताक्रुझमध्ये तिकीट देऊन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले होते. परंतु त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अन्यायाविरोधात त्यांनी अनेकदा न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई दिली आहे.
होय, मी काँग्रेसप्रवेश करणार : पालेकर
'लोकमत'शी बोलताना पालेकर यांनी यास दुजोरा दिला. पालेकर म्हणाले की, 'गेले काही दिवस सांताक्रुझ मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांशी मी बैठका घेऊन सल्लामसलत केली व त्यानुसार काँग्रेसप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. इतर गोष्टी मी प्रवेशाच्या दिवशी पत्रकार परिषदेत स्पष्ट करीन.' पालेकर यांनी आपण २०२७ ची विधानसभा - निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना मी कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही, असेही ते म्हणाले.
Web Summary : Former AAP Goa chief Amit Palekar will join the Congress party on Friday. After leaving AAP, Palekar consulted supporters in Santa Cruz. He confirmed his decision to Lokmat and plans to contest the 2027 election.
Web Summary : आप के पूर्व गोवा प्रमुख अमित पालेकर शुक्रवार को कांग्रेस में शामिल होंगे। आप छोड़ने के बाद, पालेकर ने सांताक्रूज में समर्थकों से सलाह ली। उन्होंने लोकमत को अपने फैसले की पुष्टि की और 2027 का चुनाव लड़ने की योजना बनाई।