वास्कोत कपड्यांचे दुकान भस्मसात वास्को : बुधवारी पहाटे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपालिका मार्केट इमारतीमधील शालिमार क्लॉथ स्टोअर्स या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानातील कपडे जळून खाक झाले़ या आगीमुळे दुकानमालकाचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ येथील स्वतंत्रपथ रस्त्याच्या बाजूने असलेल्या मुरगाव नगरपालिका मार्केट इमारतीत ‘शालिमार क्लॉथ स्टोअर्स’ या नावाची तीन दुकाने असून एका दुकानात कपड्यांची विक्री केली जाते़, तर इतर दोन दुकाने व या तिन्ही दुकानांवरील माळ्याचा गोदाम म्हणून वापर केला जातो़ बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या दुकानाच्या एका गोदामातून आगीचा धूर बाहेर येत असल्याचे कुणीतरी पाहिले आणि त्यांनी त्वरित वास्को अग्निशामक दलाच्या केंद्राला कळविले़ अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी त्वरित आग विझविण्यास प्रारंभ केला़ दुकाने कपड्यांनी भरलेली असल्याने अग्निशामक दलाच्या अधिकार्यांनी ताबडतोब मडगाव अग्निशामक दल, गोवा शिपयार्ड, एमपीटी या आस्थापनांच्या दलांना तसेच झुवारी व वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक केंद्रांच्या पथकांना बोलविले़ दुकानातील कपड्यांनी त्वरित पेट घेतला; पण अग्निशामक दलाच्या जवानांनी आग पसरू नये, याची दक्षता घेत सुमारे तीन तास झुंज देऊन आग नियंत्रणात आणली़ त्यामुळे या दुकानांच्या शेजारी असलेल्या औषधालयास आगीची झळ पोहोचू शकली नाही़ तसेच या दुकानाच्या मागील बाजूने असलेल्या गाड्यांनाही झळ पोहोचली नाही़ आपल्या दुकानास आग लागल्याचे कळताच या दुकानाचे मालक इलियास सयानी, सिकंदर, असरद सयानी व त्यांचे कुटुंबीय त्वरित घटनास्थळी हजर झाले़ त्यांनी मुख्य दुकान उघडून त्यातील सर्व माल बाहेर काढल्याने काही माल वाचू शकला़ इतर दोन दुकानांचा वापर गोदाम म्हणून करण्यात येत असे़ या गोदामांची कुलुपे खराब झाल्याने उघडता आली नाहीत. त्यामुळे अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण ठेवण्यात अडचण निर्माण झाली़ नंतर त्यांनी हायड्रोलिक जॅकचा वापर करून शटर वाकवून आत प्रवेश केला व आग विझविण्याचे प्रयत्न केले़ सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने दुकानात सर्व प्रकारच्या कपड्यांचा साठा केला होता़ वास्को अग्निशामक केंद्राचे अधिकारी फ्र ान्सिस मेंडिस यांना आग लागण्याचे कारण तसेच नुकसानीचा आकडा विचारला असता ते म्हणाले, अजून तपास केलेला नसून आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तविली. या आगीत सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला़ आग विझविण्यासाठी २० बंब वापरण्यात आले़ (प्रतिनिधी)
वास्कोत कपड्यांचे दुकान भस्मसात
By admin | Updated: May 15, 2014 09:57 IST