लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: अटल आसरा योजनेचे सर्व अर्ज १५ जूनपर्यंत निकालात काढण्यात येणार असून लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा करण्यात येईल. तसेच गरजूंना घरे उभारण्यासाठी दीड लाख रुपये देण्याची योजना आहे. मात्र सरकारी योजनेचाचा गैरफायदा घेतल्यास संबंधितांवर कारवाई करण्यास सरकार मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
अटल आसरा अंतर्गत घरेच बांधा. घर बांधण्याचे पुरावे सादर करणे गरजेचे असून योजनेच्या पैशातून मुलांना, नातवांना गाड्या घेतल्यास ती वाहने जप्त करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी साखळीत स्पष्ट केले. समाज कल्याण खात्यातर्फे अटल आसरा योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन शनिवारी रवींद्र भवन, साखळी येथे करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या अंतर्गत ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत, त्या सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी बोलवून त्यांचे अर्ज मंजूर करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक अर्जाना मंजुरी देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सरकार अनेक योजना आखत आहे. आता त्या योजनांचा गैरफायदा काही लोक घेत असल्याचे निदर्शनास आले असून असे यापुढे चालणार नाही. ज्यांना निवारा गरजेचा आहे, तीन लाख कमी उत्पन्न आहे, अशा लोकांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सरकारने अटल आसरा योजनेअंतर्गत दीड लाख रुपये देण्याची योजना आहे. त्याचा योग्य तो फायदा घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
'सर्व अर्ज निकाली काढू'
समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार, राज्यात विविध ठिकाणी अटल आसरा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. सरकार तुमच्या दारी योजने अंतर्गत तातडीने सर्व दाखले उपलब्ध व्हावेत व कोणाचेही अर्ज प्रलंबित राहू नयेत, त्रुटी असतील त्या दूर कराव्यात हा या शिबिराचा उद्देश असून राज्यातील सर्व अर्ज निकालात काढण्यात येतील, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
राज्यभर शिबिरे
या योजनेंतर्गत अर्ज मंजूर करण्यात ज्या त्रुटी होत्या त्या आहेत, त्या दूर करण्यासाठी राज्यभरात अटल आसरा शिबिर होणार आहे. सर्व कागदपत्रांची छाननी व अर्जाला मान्यता दिली जाईल.