पणजी : सिमेंट कंपन्यांनी डिस्पॅच हॉलिडेच्या नावाखाली पुरवठा बंद केल्याने लोकांचे हाल झाले. गोदामात सिमेंट असूनही ते ग्राहकांना मिळत नाही. बुधवारपासून दर वाढविण्यासाठीच ही कृत्रिम टंचाई केली जात असून सरकारचे त्यावर कोणतेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते. सिमेंट कंपन्या दरवाढ करायची झाली की आधी दोन दिवस असा डिस्पॅच हॉलिडे जाहीर करून पुरवठा बंद करीत असतात. गेल्या गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस अशी सुट्टी देण्यात आली आणि आता ती वाढविण्यात आली असून सोमवार, मंगळवार असे आणखी दोन दिवस लोकांना सिमेंट मिळणार नाही. गोदामात माल आहे; परंतु लोकांना मिळत नाही. सरकारी अधिकारी मात्र ढीम्म आहेत. नागरी पुरवठा खात्याच्या संचालिका दीपाली नाईक यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आपल्याकडे तक्रार आल्यास निश्चितच कारवाई केली जाईल. वाणिज्य कर आयुक्त एस. जी. कोरगावकर यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्या खात्याच्या अखत्यारित केवळ विक्री आणि त्यावरील कर इतकाच विषय येतो. (प्रतिनिधी)
राज्यात सिमेंटचा कृत्रिम तुटवडा
By admin | Updated: September 15, 2014 01:40 IST