लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : कलाकारांची भूमी, अशी ख्याती असलेल्या डिचोलीच्या ऐतिहासिक सुवर्णभूमीत कित्येक वर्षांनंतर कला भवनाची मागणी मान्य झाली आहे. ६०० प्रेक्षकांची व्यवस्था असलेल्या या कलाभवनाची उभारणी प्रशासकीय इमारतीच्या संकुलात होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या संकुलाची पायाभरणी होणार आहे.
अनेक वर्षे डिचोली येथे रवींद्र भवन उभारण्यात यावे, ही मागणी कलाकार व स्थानिकांनी लावून धरली होती. अनेक संधी आल्या, पण त्या संधीचे सोने करणे शक्य झाले नाही. त्याला राजकीय श्रेयवादाचाही फटका बसला. माजी मंत्री पांडुरंग राऊत यांनी आपल्या कार्यकाळात कला भवनाची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर रवींद्र भवन साखळीत उभारले होते.
अनेक वर्षे ही मागणी चर्चेत होती. आज त्याला मुहुर्त लाभला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार चंद्रकांत शेट्ये यांच्या प्रयत्नाने डिचोलीत कलाकारांसाठी सुसज्ज कला भवन आगामी दोन वर्षांत साकारणार आहे. त्यामुळे डिचोलीवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
८० कोटी खर्च अपेक्षित
कला भवनासाठी सुमारे ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रशासकीय संकुलात हे कला भवन एका वेगळ्या व्यवस्थेत उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये अनेक सुविधा बहाल करण्यात येणार आहेत. त्यामध्ये आधुनिक दर्जाची साऊंड सिस्टीम, वाचनालय तसेच रवींद्र भवनच्या धरतीवर अनेक सुविधा बहाल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली.