पणजी : सांकवाळ-चिखलीच्या पट्ट्यात आणि बांबोळी येथे अशा दोन ठिकाणी जुवारी नदीवर मरिना प्रकल्प उभे करावेत, असा निर्णय सरकारने तत्त्वत: घेतला आहे. तसेच एकूण ११ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यात एकूण १ हजार १३७ कोटींची गुंतवणूक होणार आहे.मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य गुंतवणूक मंडळाची सोमवारी सचिवालयात बैठक पार पडली. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, आमदार सुभाष फळदेसाई, सचिव परिमल रे, नितीन कुंकळ्येकर आदींनी बैठकीत भाग घेतला.सांकवाळ येथे मरिना प्रकल्प उभा करण्यास वन व पर्यावरण मंत्री एलिना साल्ढाणा यांचा विरोध आहे; पण तिथे मरिना उभा करण्यास मंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली. मरिना बांधण्यासाठी विविध यंत्रणांच्या अगोदर संबंधितांनी मान्यता मिळवावी व त्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाईल, असे गुंतवणूक मंडळाचे म्हणणे आहे. पर्यटन विकासासाठी मरिना गरजेचा आहे, असे मंत्री परुळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सांकवाळच्या मरिनामध्ये ५०० कोटींची, तर बांबोळीच्या मरिनामध्ये ७०० कोटींची गुंतवणूक होईल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, काही नवे उद्योग सांगे, मडकई व अन्य भागांमध्ये उभे राहणार आहेत. त्यामुळे १ हजार १३७ कोटींची गुंतवणूक होईल व २ हजार ५०० लोकांना रोजगार संधी मिळतील, असे सरकारचे म्हणणे आहे. हेप्रकल्पही सोमवारच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. (खास प्रतिनिधी)
दोन मरिनांसह ११ प्रकल्पांना मंजुरी
By admin | Updated: April 14, 2015 01:58 IST