लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सर्व्हयकल कर्करोगविरोधी लस मोफत देण्याचा कार्यक्रम सरकारी पातळीवर व्यापक प्रमाणावर हाती घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. येथे सर्व्हयकल कॅन्सरविरोधी लसीकरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
सामाजिक संघटना 'वन वल्ड गोवा' आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात अनेक महिलांचे लसीकरण करण्यात आले. या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी वन वल्ड गोवाचे प्रमुख डॉ. केदार पडते आणि टीमचे तसेच रोटरी क्लबचे कौतुक केले. ते म्हणाले, की एकदा शरीर गेले तर सर्वच गेले. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची काळजी जर कोणती असेल तर ती स्वतःच्या जीभेवर नियंत्रण ठेवणे. काय खावे आणि काय खाऊ नये, हे आपल्याला कळायला हवे. योग्य आहार ठेवणे आणि नियमितपणे योगाभ्यास करणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थितपणे सांभाळल्यास आपले आरोग्य चांगले राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वयाच्या ७३ व्या वर्षीही नियमितपणे योगाभ्यास करीत आहेत. हा आपल्यासाठी एक आदर्श आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अपप्रचाराला बळी पडू नका
सर्व्हयकल कर्करोगाविरोधी लस उपलब्ध आहे, ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि या लसीबद्दल सुरू असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नये. कारण अपप्रचार करणारे कोविडविरोधी लसीलाही विरोध करीत होते, पण त्याचे फायदे जगाने पाहिले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.