भाजप सोडला तरी अन्य पक्षात गेलो नाही; लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 03:07 PM2023-02-23T15:07:00+5:302023-02-23T15:07:55+5:30

पक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करायला हरकत नाही, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.

although he left bjp did not join any other party starring laxmikant parsekar and utpal parrikar | भाजप सोडला तरी अन्य पक्षात गेलो नाही; लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांची भूमिका

भाजप सोडला तरी अन्य पक्षात गेलो नाही; लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांची भूमिका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'पक्षाला मी नको होतो, म्हणून स्वतःच दूर झालो. कोणत्या परिस्थितीत मी पक्ष सोडला हे सर्वांनाच ठाऊक आहे. पक्ष सोडला तरी ऑफर असूनही अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. माझ्याप्रमाणे माझे अनेक कार्यकर्त्यांनीही भाजप सोडला. मात्र, तेही अन्य पक्षात गेलेले नाहीत. त्यांनीही बांधिलकी ठेवलेली आहे, असा दावा त्यांनी केला.

गेल्या वर्षी, पार्सेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली. तसेच दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यानंतर आता पार्सेकर व उत्पल यांना पुन्हा भाजपत प्रवेश द्यावा की नाही, हा निर्णय केंद्रीय नेतेच घेतील, असे विधान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले. त्याबद्दल विचारले असता, पार्सेकर म्हणाले की, आधी प्रस्ताव येऊ दे, नंतर त्यावर विचार करायला हरकत नाही. 

ते म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मला तिकीट नाकारले, तेव्हा अन्य पक्षांकडून ऑफर होत्या. परंतु मी कुठल्याही पक्षात गेलो नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. जेव्हा भाजप गोव्यात कुठेच नव्हता, तेव्हा या पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले. आमच्यावर टीका करणारे आज सत्तेबरोबर असून, सर्वकाही उपभोगत आहेत.

पराभूत झालो तरी....

पराभूत झालो तरी शैक्षणिक, सहकार क्षेत्रातून मी माझे कार्य चालूच ठेवले आहे. हरमल पंचक्रोशी शैक्षणिक संस्थेचा क्रमांक आज राज्यातील पहिल्या पाच ते दहा शाळा संस्थांमध्ये लागतो. काजू बागायती, नारळ बागायतीत लक्ष घातले. मी समाजाशी संबंध ठेवून आहे. आता पक्षाला जर माझ्या सेवेची गरज वाटत असेल तर तसा प्रस्ताव येऊ दे, नंतर पाहू! अजून काही तसा प्रस्ताव आलेला नाही.

लोकसभेसाठी माझी भूमिका स्पष्ट

दरम्यान, उत्पल पर्रीकर यांना तानावडे यांच्या विधानाबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, माझ्याकडे भाजप प्रवेशाचा अजून तरी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. माझा लढा विचारांचा आहे. मी भाजप सोडला तरी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पणजीच्या हितासाठी जे करायला हवे होते, ते गेल्या विधानसभा निवडणुकीत केले. मलाही ऑफर्स होत्या. एखाद्या पक्षात गेलो असतो तर आणखी मते मिळून निवडूनही आलो असतो. पण तसे केले नाही. पक्षात नसलो तरी भाजपचे विचार मी सोडलेले नाहीत. पणजीच्या निवडणुकीसाठी आणि लोकसभा निवडणुकीसाठी माझे विचार स्पष्ट आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: although he left bjp did not join any other party starring laxmikant parsekar and utpal parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.