लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पांडुरंग मडकईकर यांनी एका मंत्र्याने फाइल मंजूर करण्यासाठी २० लाख रुपये उकळल्याचा केलेला आरोप धादांत खोटा असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अरुण सिंह यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मडकईकर यांच्यावर याप्रकरणी पक्षांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. काही आमदारांनीही सरकारविरोधात बोलताना मर्यादा पाळाव्यात. सावंत सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे.' यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.
१३ वर्षांत विविध विकासकामे
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, 'गोव्यात भाजपच्या गेल्या १३ वर्षांच्या राजवटीत अनेक विकासकामे केली. मोपा विमानतळ, अटल सेतू, झुवारी नदीवरील नवीन पूल तसेच इतर अनेक प्रकल्प झाले. शंभर टक्के घरांमध्ये नळाचे पाणी, वीज पोचली. प्रधानमंत्री आवास योजनेखाली ३,१४४ जणांना घरे बांधून मिळाली. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेखाली राज्यात ५.३२ लाख लोकांना मोफत धान्य मिळत आहे. 'गेले दोन दिवस मी गोव्यात असून पक्ष संघटनाचा आढावा घेतला. भाजपच्या मंडल, जिल्हा व राज्य समित्या गतीने स्थापन करणाऱ्या राज्यांमध्ये गोव्याचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले नेत्तृत्त्व देशाला लाभले आहे.'