लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : केंद्र व राज्य सरकार मिळून आज समाजातील प्रत्येक घटकाचा विकास गतीने करत आहे. राज्यातील अनुसूचित जाती, जमातीच्या बांधवांनी मुख्य प्रवाहात यावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांच्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्या योजना या समाजबांधवांपर्यत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
अनुसूचित जमातीत हिंदूंबरोबर काही ख्रिश्चन बांधव आहेत. प्रत्येक घरात या योजना पोहोचवा, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी सुर्ला येथे केले. गोवा राज्य अनुसूचित जाती, जमाती वित्त आयोग विकास महामंडळातर्फे या बांधवांसाठी विविध केंद्र व राज्याच्या योजना संदर्भात जागृती शिबिर तसेच वेगवेगळ्या योजनांच्या मंजुरी पत्रांचे वितरण करण्याचा कार्यक्रम सातेरी मंदिर, बये-सुर्ला येथे पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लिकर, सरपंच साईमा गावडे, महामंडळाचे संचालक दशरथ रेडकर, अध्यक्ष वासुदेव गावकर, व्यवस्थापकीय संचालक दीपेश प्रियोळकर, संचालक व पंच सदस्य उपस्थित होते. यावेळी वासुदेव गावकर, गोपाळ सुलिंकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध योजनांची माहिती देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित समाज बांधवांना दिली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनांच्या मंजुरी पत्रांचे वितरण लाभार्थीना करण्यात आले.
शिक्षण, रोजगार देण्यासाठी कटिबद्ध
अनुसूचित जमातीमध्ये आजही हिंदू व ख्रिस्ती बांधवांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्यापर्यंत बऱ्याच योजना पोहोचलेल्या नाहीत. अनेकांना दोन टक्के व्याज व ४० टक्के दराने वाहने व इतर सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या बांधवांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी चांगले शिक्षण तसेच रोजगारामध्ये प्रोत्साहन दिल्यास निश्चितपणे त्यांच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रेमेंद्र शेट यांचे आवाहन
आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. समाज बांधवांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आज विकास प्रत्येकाच्या दारात पोहोचत असून अनुसूचित जाती, जमाती बांधवांनी त्याचा योग्य प्रकारे लाभघेण्याचे आवाहनही शेट यांनी केले.