लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मंत्रिमंडळ फेररचनेनंतर मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. दिगंबर कामत यांना कला व संस्कृती तसेच पेयजल व अन्य एखादे वजनदार खाते तसेच रमेश तवडकर यांना क्रीडा व आदिवासी कल्याण ही खाती मिळण्याची दाट शक्यता आहे.
दिगंबर कामत यांनी यापूर्वी मंत्री असताना कला व संस्कृती खात्याची जबाबदारी सांभाळलेली आहे. बरीच वर्षे त्यांच्याकडे वीज खातेही होते. या खात्यातील खडानखडा माहिती त्यांच्याकडे आहे. परंतु वीज खाते सध्या सुदिन ढवळीकर यांच्याकडे आहे. तवडकर यांनीही मंत्री असताना आदिवासी कल्याण, क्रीडा व कृषी आदी निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री खाती सांभाळली आहेत. २०२२ च्या बनल्यावर प्रमोद सावंत यांनी आदिवासी कल्याण खाते स्वतःकडेच ठेवले होते. वन निवासींचे जमिनींच्या हक्कांचे सुमारे १० हजार दावे प्रलंबित आहेत. मार्च २०२६ पर्यंत सर्व दावे निकालात काढण्याचा संकल्प सावंत यांनी सोडला आहे. त्यामुळे हा संकल्प पूर्ण होण्याआधीच ते आदिवासी कल्याण खात्याची जबाबदारी तवडकर यांच्याकडे सोपवतात का? हे पाहावे लागेल.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाजन करुन मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच रस्ते व इमारती आणि पेयजल अशी दोन वेगवेगळी खाती निर्माण केली आहेत. पेयजल खाते जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. वीजमंत्री असताना कामत यांनी जनतेला दिलेली सेवा सर्वज्ञात आहे. ते नेहमीच लोकांना उपलब्ध असायचे. वीज गायब झाली तर मध्यरात्रीही लोक त्यांना फोन करायचे व दिगंबर कॉल रिसिव्ह करुन तक्रारी दूर करायचे. पेयजल खात्याला ते अशाप्रकारे न्याय देऊ शकतात, असे भाजपच्या काही नेत्यांना वाटते.
गोविद गावडे यांना गेल्या १४ जून रोजी डच्चू दिल्यानंतर त्यांच्याकडील सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडे आली. आता आलेक्स सिक्वेरा यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडील पर्यावरण, कायदा व्यवहार आदी खातीही सावंत यांच्याकडे आलेली आहेत. आज गुरुवारी कामत व तवडकर यांचा शपथविधी झाल्यानंतर या दोघांना खातेवाटप केले जाते की चतुर्थीनंतर याबद्दल उत्कंठा आहे.