पणजी : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनिमित्त गोव्यातील सर्वपक्षीय नेते व प्रमुख पदाधिकारी प्रचारासाठी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, आमदार महाराष्ट्रात आहेत, तर सलग पाच दिवस सुट्टी असल्याने सरकारी अधिकारी व कर्मचारी सहलींचा आनंद लुटत आहेत. परिणामी प्रशासकीय पातळीवर ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी स्थिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होईपर्यंत गोवा भाजपचे बहुतेक नेते गोव्याबाहेरच असतील. अनेक मंत्री, आमदार प्रचाराच्या कामात मग्न आहेत. गोव्याहून मोठ्या संख्येने भाजप समर्थक, शिक्षकही महाराष्ट्रात प्रचारासाठी गेले आहेत. ‘आम्ही महाराष्ट्रात असलो, तरी आम्ही फोनवर गोव्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून कामे करून घेतो,’ असे एका मंत्र्याने सांगितले. गोव्यातील काँग्रेसचे काही पदाधिकारीही महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरत आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गची जबाबदारी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हेही प्रचारासाठी जातील, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर गेले काही दिवस आबाळच आहे. सलग चार-पाच दिवस सुट्टी मिळाल्याने बरेच अधिकारी व कर्मचारी सहलीवर गेले. बेळगाव, कोल्हापूर अशा ठिकाणी कर्मचारी सहकुटुंब फिरायला गेले आहेत. एरव्हीही अनेक आयएएस व आयपीएस अधिकारी अधूनमधून दिल्लीला जात असतात. (खास प्रतिनिधी)
प्रशासन मंदावले!
By admin | Updated: October 7, 2014 01:43 IST