रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करणा-या पर्यटकांवर होणार कारवाई, ठोठावणार दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 02:52 PM2017-10-25T14:52:31+5:302017-10-25T14:55:16+5:30
रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून स्वयंपाक करणा-या पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा आहे. पर्यटक अनेकवेळा पार्किंगच्या ठिकाणी सिलींडरचा वापर करून स्वयंपाक करतात.
म्हापसा : गोव्यात रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून स्वयंपाक करणा-या पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा आहे. मागील दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून पर्यटकांनी स्वयंपाकासाठी वापरलेले सिलींडर ताब्यात घेऊन त्यांना दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली. रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून स्वयंपाक करणे धोकादायक आहे. पर्यटकांना सूचना करून सुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे लोबो म्हणाले.
पर्यटक अनेकवेळा पार्किंगच्या ठिकाणी सिलींडरचा वापर करून स्वयंपाक करतात. सिलींडरचा स्फोट झाल्यास किंवा वाहनातील इंधनाला आग लागल्यास दुर्घटनाही घडू शकते असे त्यांनी सांगितले.
पर्यटन हंगाम सुरू झाल्याने बरेच पर्यटक बसेस किंवा खासगी वाहनातून येतात. मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करून स्वयंपाक करतात. त्यातून सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी करतात. अशा पर्यटकांना अनेकवेळा इशाराही देण्यात आलेला. हटवण्यात आलेले; पण हे पर्यटक जागा बदलून पुन्हा तेच करतात. म्हणून कारवाई करणे भाग पडल्याचे लोबो म्हणाले.
अशा प्रकारे वाहनाने गोव्यात येणा-या पर्यटकांनी एखादी खोली भाड्यावर घेऊन स्वयंपाक करावे. भाड्यावर खोली देणा-या व्यक्तीजवळ योग्य परवाना आवश्यक आहे; पण उघड्यावर स्वयंपाक केल्यास सार्वजनिक हीत, लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन कारवाई केली जाईल असे मायकल लोबो म्हणाले.