लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २७ वर्षापूर्वी गाजलेल्या वीज अनुदान घोटाळा प्रकरणातून तत्कालीन वीजमंत्री व विद्यमान वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश इर्शाद आगा यांनी काल, सोमवारी निवाडा सुनावला. यानंतर गुदिन्हो यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
१९९४ ते १९९८ या काळात माविन गुदिन्हो काँग्रेसच्या सरकारमध्ये वीजमंत्री होते. ११ मे १९९८ रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते स्व. मनोहर पर्रीकर यांनी गुदिन्हो आणि अन्य चौघांविरोधात गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. वीजमंत्री गुदिन्हो यांनी कंपन्यांना वीजदरात सवलत देण्यासाठी दोन स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या होत्या.
राज्यातील औद्योगिक आस्थापनांना वीजदरात सवलत देण्याच्या नावाखाली गुदिन्हो यांनी घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर केला होता. नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात उत्तर गोवा विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश इर्षाद आगा यांनी निवाडा देताना गुदिन्हो यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांना दोषी ठरविण्यासाठी ठोस पुरावे न्यायालयात सादर होऊ शकले नाहीत, त्यामुळे गुदिन्हो यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
गुदिन्हो यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात त्यांनी औद्योगिक आस्थापनांना वीजदरात २५ टक्के सवलत दिल्याचे म्हटले आहे. या सवलतीमुळे सरकारचे ४.५२ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप झाला होता. सवलत देण्याची अधिसूचना २७जून १९९८ रोजी जारी करण्यात आली होती. या प्रकरणात मे २००१ मध्ये गुदिन्हो यांच्यासह वीज खात्याचे तत्कालीन मुख्य अभियंते टी नागराजन यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात गुदिन्हो यांच्यासह माजी मुख्य वीज अभियंते टी. नागराजन, विठ्ठल भंडारी, आर. के. राधाकृष्णन आणि के. व्ही. एस. कृष्ण कुमार हे इतर आरोपी होते. त्यांच्यावर कलम १३ (डी) (१) (३) आणि भारतीय दंड संहितेच्या १२० (बी) कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले होते.
न्यायालयाच्या निवाड्याने आपल्या कर्तव्यनिष्ठ कामाची पोचपावती मिळाली आहे. आपल्या प्रामाणिक व्यवहारांचा हा विजय आहे. मात्र, यासाठी मला २७ वर्षे प्रदीर्घ लढा द्यावा लागला. या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला खूप काही सोसावे लागले. वीज घोटाळा करणारा मंत्री म्हणून माझी बदनामी केली गेली. यातूनही उशिरा का असेना मला न्याय मिळाला. यातून माझी माझ्या कामावरील श्रद्धा आणखी प्रबळ झाली. - माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री.
मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी रचले कुभांड
काँग्रेस पक्षात असताना मी मुख्यमंत्री होऊ शकतो, असे लक्षात आल्याने काही नेत्यांनी मला अडकवण्यासाठी स्व. मनोहर पर्रीकर यांना वीज अनुदान घोटाळा झाल्याचे सांगत खोटी कागदपत्रे देण्यात आलेली.
नंतर मात्र या प्रकरणात माझा काहीच दोष नसल्याचे तेव्हा सांगून काही काँग्रेस नेत्यांनीच तुझ्याविरोधात मला कागदपत्रे पुरवली होती, असे पर्रीकर यांनी सांगितल्याचे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
कार्यकर्ते ठामपणे उभे राहिल्याने आणि देवाच्या कृपेनेच मला इतक्या वर्षानंतर न्यायालयाने निर्दोष जाहीर केले. याचा मला मोठा आनंद झाला असे ते म्हणाले.