लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवात सुरक्षेसंदर्भात प्रशासनव्यवस्था अपेक्षित होती, त्यासंदर्भात प्रशासनाने केलेली दिरंगाईबद्दल देवस्थान समितीने त्रुटींवर बोट ठेवले आहे. व्यवस्थापन नेटके झाले नाही. तसेच गेल्यावर्षी एक घटना घडल्यानंतर खबरदारी घेणे अपेक्षित होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले दुर्दैवी घटना घडल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे.
या प्रकरणात देवस्थान मात्र कुठेच कमी पडलेले नाही. जी घटना घडली त्या घटनेचा तपशीलवार तपास करून सरकारने दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देवस्थान समितीचे नूतन अध्यक्ष दीनानाथ गावकर व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी विद्यमान समितीवर प्रसारमाध्यमातून आरोप केले आहेत. ते आरोप पूर्णपणे दिशाहीन असून त्यात काहीच तथ्य नसल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचा दावा लईराई देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर, भास्कर गावकर, आतिष गावकर, दयानंद गावकर व इतर समिती पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
नवीन समितीने २ एप्रिल रोजी ताबा घेतला. त्यापूर्वी जी कमिटी होती तिने देवस्थानच्या जत्रोत्सवा संदर्भात आवश्यक प्रशासकीय पाठपुरावा करणे व पत्रव्यवहार करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी त्यासंदर्भात काहीही भूमिका घेतलेली नाही. आम्ही तातडीने प्रशासनाची पत्रव्यवहार करून २ रोजी मामलेदारांना पत्र दिले. त्यानंतर मामलेदाराने १५ रोजी नोटीस काढली. १६ रोजी बैठक घेतली त्यावेळी संयुक्त मामलेदार आले होते. २५ रोजी आढावा बैठक घेण्याचा निर्णय होता. यावेळी वासू गावकर, महादेव गावकर, प्रकाश गावकर, सुभाष गावकर, विश्वंभर गावकर, उपेंद्र गावकर, बाबूसो गावकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. एक्झिट ट्रेंटी पॉईंट तसेच ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहे, त्यासंदर्भात सर्व प्रकारची माहिती दिली होती. गेल्यावर्षी त्याच ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला होता या ठिकाणी रस्त्यालगतची भिंत हटविण्यात यावी, अशी मागणी बैठकीत केली होती.
सूचनांकडे दुर्लक्ष आणि....
देवस्थान समितीकडून विविध सूचना करण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या बाजूला दुकाने नको व इतर बाबतीत कल्पना दिली होती. दि. २५ रोजी होणारी बैठक त्यांनी पुढे ढकलली व २८ रोजी घेतली. त्यानंतर २९ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत काही सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर ३० रोजी पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक घेतली. त्यामुळे मामलेदार व टीमने या उत्सवाच्या आयोजनाबाबत दिरंगाईची भूमिका घेतली. पत्रव्यवहार करूनही बैठकीत काही अधिकारी उपस्थित राहिलेच नाही. त्यामुळे त्रुटी राहून गेल्या, असेही देवस्थान समितीने म्हटले आहे. अखेर ३० रोजीच्या व्यापक बैठकीत अनेक मुद्दे चर्चेत आले.