मडगाव : नावेली येथे सात ठिकाणी दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला असतानाच या गावापासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर असलेल्या फात्राडे-वार्का येथे सोमवारी रात्री चोरट्यांनी कीर्ती माधोक यांच्या घरात शिरून पावणेदोन लाख रुपयांची रोख आणि इतर सुवर्णालंकार असा एकूण ८.८५ लाखांचा ऐवज लंपास केला.ही घटना सोमवारी रात्री घडल्याची तक्रार कोलवा पोलीस स्थानकावर नोंद झाली आहे. खिडकीचा स्लायडिंग दरवाजा उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व कपाटातील दोन सोन्याच्या बांगड्या, एक ब्रेसलेट, एक हिऱ्याची अंगठी, दोन सोन्याचे पैंजण असा सात लाखांचा ऐवज आणि १.८५ लाख रुपये रोख, असा ऐवज पळवून नेला.या प्रकरणात कोलवाचे उपनिरीक्षक रितेश तारी हे तपास करीत आहेत. या चोरीच्या घटनेमुळेही वार्का परिसरात भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
वार्कात ८.८५ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2015 01:45 IST