पणजी : गोमेकॉतील एमबीबीएसच्या जागा वाढवून १५० करण्यास या वर्षीही आॅल इंडिया मेडिकल कौन्सिलने अनुकूलता दर्शविली असून, त्यासंबंधीचे पत्र गोमेकॉला आलेले आहे. १२८ जागा गोमंतकीयांसाठी राखीव असणार असून प्रथमच ओबीसींना २७ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल यांना विचारले असता, आॅल इंडिया मेडिकल कौन्सिलचे अनुकूलता दर्शविणारे पत्र सोमवारीच आले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १३ व १४ जून रोजी मेडिकल कौन्सिलची बैठक होत असून त्या वेळी आढावा घेतला जाईल. या वर्षीही १५० जागांसाठीचा प्रवेश ९९ टक्के पक्का झाला आहे, असे त्यांनी सांगितले. मेडिकल कौन्सिलचे पत्र न मिळाल्याने गेल्या वर्षीप्रमाणेच घोळ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. गेल्या वर्षी अखेरच्या क्षणी वाढीव जागांवर प्रवेश देण्यात आला होता. तांत्रिकी शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, असे सांगण्यात आले की, मेडिकल प्रवेशासाठीची पहिली फेरी इतर व्यावसायिक महाविद्यालयांप्रमाणेच येत्या १६ ते २० जूनपर्यंत होणार आहे. गोव्याच्या कोट्यातील ३५ जागा ओबीसींकरिता, १४ जागा अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांकरिता, ३ जागा मागासांकरिता, २ जागा एनआरआयकरिता राखीव असतील. दंत महाविद्यालयात ४० पैकी ३४ जागा गोमंतकीयांना, तर उर्वरित ६ जागा अखिल भारतीय कोट्यातून दिल्या जातील. यात ओबीसींना ९ जागा मिळणार आहेत, तर अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना ४ जागा मिळतील. बी. फार्ममध्ये सरकारी फार्मसी कॉलेजमध्ये ६० जागांपैकी १६ ओबीसींना व ७ अनुसूचित जमातींना दिल्या जातील. फोंड्याच्या पीईएस फार्मसी कॉलेजमध्येही अशीच व्यवस्था आहे. दरम्यान, तांत्रिकी शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक प्रदीप कुस्नूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एकूण १३०० जागा आहेत. फर्मागुडी येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, शिरोडा येथील रायेश्वर इन्स्टिट्यूट, फातोर्डा येथील डॉन बॉस्को महाविद्यालय आणि आसगाव येथील आग्नेल इन्स्टिट्यूट या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी २५०० तर पदविका अभ्यासक्रमांसाठी २००० अर्ज आलेले आहेत. पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली असून गुणवत्ता यादी येत्या आठवड्यात जाहीर केली जाईल. येत्या २४ ते २८ जून या कालावधीत पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची पहिली फेरी होणार आहे. (प्रतिनिधी)
गोमेकॉत एमबीबीएसच्या १५0 जागा
By admin | Updated: June 10, 2014 01:49 IST