प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असलेले बार्देश तालुक्यातील १२ हजार रेशनकार्डधारक अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अशा कार्डधारकांना नोटिसा पाठवण्याचे काम नागरी पुरवठा विभागीय कार्यालयाकडून हाती घेण्यात आले असून, त्यावर योग्य सुनावणी पूर्ण केल्यानंतर पुढील निर्णय विभागीय कार्यालयाकडून घेतला जाणार आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सुमारे ६८ हजार तसेच अंत्योदय योजनेंतर्गत ४५०० रेशनकार्डधारक मिळून सुमारे ७२ हजार रेशनकार्डधारक आहेत. यातील १२ हजार कार्डधारकांना नोटिसा पाठवण्याचे काम सुरू केले आहे. नोटिसा पाठवलेल्या कार्डधारकांची टप्प्याटप्प्यात सुनावणी घेतली जाणार आहे. ज्या कार्डधारकांची वर्षाची मिळकत ५० हजार किंवा त्याखाली असेल तेच पात्र ठरवले जाणार आहेत. तसेच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी १ लाख २० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे. दिव्यांगांना मात्र मिळकतीतून वगळण्यात आले आहे.
अपात्रतेची कारणे
यातील बऱ्याच कार्डधारकांनी मागील ६ महिन्यांत कार्डचा वापर केलेला नाही. काही जणांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेताना प्रत्येक योजनेत त्यांची मिळकत तसेच इतर माहिती वेगवेगळी दर्शवली असल्याचे आढळून आले आहे. अनेकांनी वाहने विकत घेतली असून, स्वतःच्या नावावर मालमत्ता सुद्धा असल्याचे आढळून आले आहे. या विविध कारणास्तव त्यांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.
कारवाई, तरीही रेशनकार्ड रद्द करणार नाही...
सुनावणीनंतर त्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अपात्र ठरवले जाणार असले, तरी त्यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार नाही. त्यांना गरीब रेषेवरील रेशनकार्ड वितरित केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, बार्देश तालुक्यातील सर्व म्हणजे ३३ पंचायतींत २८ सप्टेंबर रोजी विभागीय कार्यालयाच्या वतीने केवायसी मोहीम हाती घेतली जाणार आहे. प्रत्येक कार्डधारकांनी पंचायत कार्यालयात जाऊन त्याचा लाभघेण्याची सूचना केली आहे.