मडगाव: गोव्यातील ‘कमर्शियल टाऊन’ म्हणून ओळख असलेल्या मडगाव शहरात तब्बल 11 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे स्थानिक नगरपालिकेने जाहीर केल्यामुळे लोकांचे धाबे दणाणले आहेत. त्यापैकी काही इमारती अत्यंत गजबजलेल्या रस्त्याच्या शेजारी असल्याने सामान्यांचा जीवही त्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वास्तविक तीन वर्षापूर्वी या इमारती धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्या खाली कराव्यात यासाठी मडगाव पालिकेने नोटीसही जारी केली होती. मात्र असे असूनही या इमारतीत अजूनही लोक रहात आहेत. त्यामुळे या इमारती रहिवाशांसाठीही धोकादायक बनल्या असून काही इमारतींची परिस्थिती एवढी नाजूक आहे की, कधीही अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मडगाव पालिकेने जी धोकादायक इमारतींची यादी बनवली आहे. त्यापैकी एका इमारतीत माध्यमिक विद्यालयही सुरु आहे. या इमारतीत शाळा चालू ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखेच आहे, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.या सर्व इमारतींच्या मालकांनी आपल्या इमारतीच्या क्षमता सिद्ध करणारे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल स्टेबिलिटी प्रमाणपत्र सादर करावे अशी नोटीस मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी जारी केले आहे. हे प्रमाणपत्र सादर न केल्यास या इमारतीचा पाणी व वीज पुरवठा बंद करण्यात येईल असेही या नोटीसीत म्हटले आहे. असे जरी असले तरी एका हॉटेलच्या मालकाकडे असलेल्या इमारतीव्यतिरिक्त अन्य कुठल्याही इमारतीच्या मालकांनी असे प्रमाणपत्र सादर केलेले नाही अशी माहिती नाईक यांनी दिली.
धोकादायक इमारतींची यादी1) गोल्डन फोटो स्टुडिओ इमारत, मडगाव2) च्युरी बिल्डींग, ग्रेस चर्चच्या मागे.3) परिश्रम रायकर इमारत, रेल्वे गेट जवळ.4) न्यू इरा हायस्कूल इमारत, मालभाट5) विला कुतिन्हो बिल्डींग, खारेबांद6) प्रेदियो कादरेज बिल्डींग, खारेबांद7) ग्रासियश फुर्तादो बिल्डींग, खारेबांद8) तिळवे बिल्डींग, मडगाव.9) सुकडो बिल्डींग, सिने लता जवळ10) माशरेन बिल्डींग, लोहिया मैदानाजवळ.11) सबिना हॉटेल, जुने बस स्टँड, मडगाव.