गडचिरोली : गडचिरोली येथील तत्कालीन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी यांनी जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून राबविलेल्या अगरबत्ती प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे. या प्रकल्पासाठी बांबूकाड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. परंतु सहा महिन्याअगोदर खरेदी करण्यात आलेल्या ९०० ते एक हजार क्विंटल काड्यांची मजुरी अहेरी तालुक्यातील येंकाबंडा गावातील मजुरांना देण्यातच आली नाही. मजुरी देण्यासाठी वन विभाग आता टाळाटाळ करीत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. यासंदर्भात येंकाबंडा परिसरातील नागरिकांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. वनमंत्र्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेरीस १ सप्टेंबर रोजी जिमलगट्टा वन परिक्षेत्र कार्यालयासमोर या मजुरांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अभिनव प्रकल्पाच्या नावाखाली मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी जिल्ह्यात ६० ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प सुरू केले होते. खासगी स्वयंसेवी संस्थेला या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ करून देण्यात आला. वन विभागाची यंत्रणा मनमानीपणे या ठेकेदारासाठी राबविण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार वन परिक्षेत्रात बांबू काड्यांची खरेदी अगरबत्ती प्रकल्पासाठी करण्यात आली. मात्र या काड्या जमा करणाऱ्या मजुरांना मोबदला देण्यात आला नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मजुरीबाबत हात वर केली आहे. त्यामुळे मजुरांनी १ सप्टेंबर रोजी जिमलगट्टा कार्यालयासमोर आंदोलन करण्याची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)
अगरबत्ती प्रकल्पासाठी काड्या पुरविणाऱ्यांना मजुरीच मिळाली नाही
By admin | Updated: September 1, 2015 01:16 IST