सात महिन्यांपासून मजुरी थकली : आलापल्ली वन विभागात मजूर आक्रमकआलापल्ली : वनपरिक्षेत्र कार्यालयातील मजुरांची मजुरी मागील अनेक महिन्यांपासून मिळाली नाही. दिवाळीपूर्वी सदर मजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी मजुरांनी आलापल्ली येथील वनसंपदा उपवनसंरक्षक कार्यालयासमोर गुरूवारी ठिय्या आंदोलन केले.आलापल्ली वन विभागाअंतर्गत आलापल्ली वनपरिक्षेत्रातील जंगलात विविध प्रकारची कामे करण्यात आली. जंगलात काम करणाऱ्या मजुरांना त्यांची मजुरी थेट न देता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे धोरण वन विभागाने अवलंबिले. त्यानुसार वनपरिक्षेत्राधिकारी यशवंत नागुलवार यांनी मजुरांच्या बँक खात्याची प्रक्रिया पूर्ण पाडली व आलापल्ली उपवनसंरक्षक यांनीसुद्धा मजुरांच्या मजुरीचा निधी बँकेकडे वळता केला. मात्र बँकेने सदर रक्कम मजुरांच्या बँक खात्यावर जमा केली नाही. याला सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सात महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने मजूर आक्रमक झाले. गुरूवारी या सर्व मजुरांनी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात ३०० पेक्षा जास्त मजूर सहभागी झाले होते.उपवनसंरक्षक गिन्नी सिंह यांनी मजुरांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मजूर वनसंपदा कार्यालयातच ठिय्या मांडून बसले होते. उपवनसंरक्षकांनी बँकेतूनच मजुरीची रक्कम मिळेल, या भूमिकेवर त्या ठाम होत्या. त्यानंतर मजुरांनी आपला मोर्चा वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या घराकडे वळविला. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनीही रोख मजुरी देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे मजुरांची दिवाळी आर्थिक अडचणीतच जाण्याची शक्यता आहे. आर्थिक पारदर्शकतेच्या दृष्टीने मजुरांचे पैसे बँक खात्यातच जमा होणे आवश्यक असले तरी बँकेच्या नावावर विलंब होता कामा नये, अशी भूमिका नंतर मजुरांनीही स्वीकारली. मात्र दिवाळीपूर्वी मजुरी मिळणार नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण दिसून आले. (प्रतिनिधी)
मजुरीसाठी मजुरांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: October 28, 2016 01:01 IST