भामरागड : ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या नेतृत्वात येथील बचत गटाच्या महिलांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात दंड थोपाटत शुक्रवारी तब्बल साडेचार लाखांची देशी, विदेशी दारू जप्त केली व जप्त केलेली दारू पोलिसांच्या सुपूर्द केली.अवैध दारू विक्रीमुळे भामरागड शहरातील तसेच तालुक्यातील अनेक सुखी संसार उद्ध्वस्त झाले. अवैध दारू विक्रीमुळे येथील महिलांना त्रास होत होता. याबाबत महिलांनी अनेकदा पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नव्हती. त्यामुळे शुक्रवारी सुप्रसिध्द समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या पत्नी समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांनी अवैध दारू विक्रीविरोधात पुढाकार घेतला. अखेर त्यांच्या नेतृत्वात शुक्रवारी बचतगटाच्या शेकडो महिलांनी एकत्र येऊन वार्ड क्रमांक १ मधील दारूविक्रेता सिदाम व्यापारी व विश्वजीत कर्मकार यांच्या घरी धाड टाकून २०० पेट्यातील ९ हजार ५०० बॉटल देशी, विदेशी दारू जप्त केली. या दारूची किंमत सुमारे साडेचार लाख रूपये आहे. भामरागड पोलिसांनी दारूविक्रेता आरोपी सिदाम व्यापारी तसेच त्याची पत्नी व आरोपी विश्वजीत कर्मकार यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ ई/८३ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली. अवैध दारूविक्रीच्या त्रासाला कंटाळून बचत गटाच्या महिला हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात जाऊन अवैध दारू विक्रीची समस्या समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना सांगितले. त्यांनी महिलांना होकार दर्शवीत दारू पकडण्यासाठी पुढाकार घेतला. या कारवाईत आमटे परिवारातील महिलांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. प्रथमच महिलांनी मोठ्या प्रमाणात दारू पकडली.
महिलांनी साडेचार लाख रुपयांची दारू पकडली
By admin | Updated: August 30, 2014 01:27 IST