विसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूरदरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी प्रशासनाकडे लावून धरली होती. मात्र संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदर मार्ग खड्ड्यात असल्याचे चित्र आहे. देसाईगंज-कुरखेडा या मुख्य मार्गावर विसोरा व शंकरपूर हे अवघ्या दोन किमी अंतरावर असलेली महत्त्वाची गावे, या दोन गावांच्या दरम्यान गाढवी नदी वाहते. सद्यस्थितीत या नदीवर असलेल्या ठेंगण्या पुलामुळे पावसाच्या दिवसात आठ ते दहा वेळा रहदारी बंद होते. त्यामुळे सदर नदीवर मागील तीन वर्षापासून उंच पूल बांधण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु अजूनही हे काम अपूर्णच आहे. पावसाच्या दिवसात काम बंद राहत असल्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या पाहणीवरून येत्या वर्षभरातही हे काम पूर्ण होणार की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, विसोरा ते शंकरपूर हे दोन किलोमीटरचे अंतर पार करायला पाच मिनिटाऐवजी आजघडीला अर्धा तास लागत आहे. वडसा ते कुरखेडा या मार्गे ये-जा करण्यासाठी वडसा-एकलपूर-कोरेगाव-शंकरपूर-कुरखेडा हा पर्यायी मार्ग आहे. मात्र या पर्यायी मार्गाने गेल्यास १० ते १२ किमी अंतराचा फेरा होतो. मात्र असे असले तरीही देसाईगंज-विसोरा-शंकरपूर-कुरखेडा याच मार्गाने सर्वात जास्त वाहनधारक खड्डे, धुळीचा त्रास सहन करून वाहने चालविणे पसंत करत आहेत, असे दिसते. परिणामी विसोरा-शंकरपूर या मार्गाची दुरवस्था झाली आहे.
विसोरा-शंकरपूर मार्गाची दुरवस्था
By admin | Updated: October 18, 2014 23:25 IST