गडचिराेली : जुनी पेंशन बंद केल्याने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचे हाल हाेत आहेत. मानवीदृष्टिकाेन लक्षात घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करावी, अशी मागणी जुनी पेंशन हक्क संघटनेने पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आ.ॲड.अभिजित वंजारी यांच्याकडे केली आहे.
१ नाेव्हेंबर २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेंशन याेजना बंद करून अंशदायी पेंशन याेजना सुरू केली आहे. यासाठी डीसीपीएस याेजना सुरू केली हाेती. काही वर्षातच पुन्हा ती बंद करून एनपीएस याेजनेत कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले. मात्र या याेजनेत सेवानिवृत्तीनंतर पेंशन देण्याची काेणतीच तरतूद नाही. ३० वर्षांची सेवा दिलेला कर्मचारी जेव्हा सेवानिवृत्त हाेते तेव्हा त्याचे हाल हाेतात. जे कर्मचारी पाच-दहा वर्षांच्या सेवेनंतर मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांच्या कुटुंबाचे हाल हाेत आहेत. मृत कर्मचाऱ्याच्या परिवाराचे हाल व ससेहाेलपट थांबविण्यासाठी केंद्र शासनाप्रमाणेच जुनी कुटुंब निवृत्तीवेतन याेजनेचे लाभ द्यावे, अशी मागणी आ.ॲड.अभिजित वंजारी यांच्याकडे केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या इतरही समस्यांवर चर्चा केली. राज्य शासनाकडे यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन आ.ॲड.वंजारी यांनी दिले. शिष्टमंडळात जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश आखाडे, आराेग्य विभागाचे जिल्हा संघटक गजानन गेडाम, मनीष बानबले, राजू साेनटक्के, विशाल काटवले, माेहन दाेडके हजर हाेते.