लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मार्च महिन्यातच नद्यांचे पात्र कोरडेठाक पडले आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आहे. रानटी हत्तींचा धुडगूस वाढला आहे, पण पालकमंत्री व सहपालकमंत्री आहेत कुठे, असा सवाल काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी २४ रोजी केला आहे.
जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरीसारख्या मोठ्या नद्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तर कधी गोसेखुर्द धरणातील विसर्ग किंवा मेडीगड्डा धरणातील 'बॅकवाटर'मुळे जिल्ह्यात वारंवार पूरस्थिती निर्माण होते. यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. ही भरपाई भरून काढण्यासाठी नदीकाठावरील अनेक शेतकरी उन्हाळी पिके घेतात. मात्र, गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. भरपाई देण्याची मागणी काँग्रेसने केली.
नदीपात्रात आंदोलन करण्याची तयारीशेतकरीप्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी नदीपात्रात उतरून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे. रानटी हत्तींनी आरमोरी तालुक्यात मका पिकाचे नुकसान केले. यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. पालकमंत्री व सहपालकमंत्री हेलिकॉप्टर दौरे करून जातात, पण शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नाहीत, असा आरोप ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.