चामोर्शी : चामोर्शी पंचायत समितीचे कृषी अधिकारी युवराज पत्रूजी लाकडे यांना शेतकर्याकडून दीड हजार रूपयाची लाच घेतांना गुरूवारी दुपारी १२.३५ वाजता पंचायत समिती कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. चामोर्शी तालुक्यातील वेलगुर तुकूम येथील शेतकरी गंगाधर धर्मा शेडमाके (२४) यांना आदिवासी उपयोजन योजनेंतर्गत बैलबंडी शेती उपयोगाकरिता मंजूर झालेली होती. पंचायत समितीचे कृषी अधिकारी युवराज पत्रूजी लाकडे यांनी बैलबंडी हस्तांतरण करण्याच्या कामासाठी दीड हजार रूपयाची लाच मागितली.
त्यानंतर गंगाधर शेडमाके यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांच्याकडे कृषी अधिकारी पंचायत समिती चामोर्शी यांच्या विरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी गुरूवारी सापळा रचून दुपारी १२.३५ वाजता कृषी अधिकारी युवराज लाकडे यांना शेतकरी गंगाधर शेडमाके यांच्याकडून दीड हजार रूपये घेतांना पकडले. लाकडे यांच्या विरूद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात कलम ७, ३ (१) (ड) सह १३ (२) लाच प्रतिबंधक कायदा सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करून लाकडे यांना अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, पोलीस हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, पोलीस नाईक रवींद्र कत्रोजवार, परिमल बाला, वसंत जौंजाळकर, उमेश मासुरकर यांनी केली. (शहर प्रतिनिधी)