प्रतीक मुधोळकर कांदोळीएटापल्ली तालुक्यातील कांदोळी गावचा दोगे आत्राम हा नक्षली हल्ल्यात शहीद झाला. सोमवारी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याच्यावर चोख पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे शव गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दाखल होताच हजारो आदिवासी व त्याचे आईवडील यांच्या अश्रुंना पारावार राहिला नाही. गावचा ‘पेका’ (मुलगा) गेला या एकाच भावनेने संपूर्ण कांदोळी गहीवरून गेली होती.घरची परिस्थिती हलाखीची असतानाही दोगेने आपले शिक्षण पूर्ण केले. लोकबिरादरी प्रकल्पाच्या आश्रमशाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अहेरीच्या भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालयात पुढचे शिक्षण घेतले. लहानपणापासून देश सेवेची आवड व इच्छा असल्याने पोलीस सेवेत दाखल होण्याचा दोगेचा निर्धार पक्का होता. एक उत्कृष्ट कबड्डीपटू व मनमिळावू मृदू स्वभावाचा व्यक्ती म्हणून तो अनेकांचा आवडता होता. गरीब कुटुंबातून पुढे येऊन पोलीस दलात नोकरी मिळविलेला तो त्याच्या कुटुंबाचा एकमेव सदस्य होता. नक्षली हल्ल्यात तो शहीद झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे पार्थिव गडचिरोलीवरून सोमवारी कांदोळी गावात आणल्यानंतर पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ त्याच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. दोगेच्या मागे पत्नी, मुली, वृद्ध आईवडील, एक भाऊ, तीन बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे. कांदोळी गावाने आपला पूत्र गमावला, अशी भावना अनेकांनी याप्रसंगी व्यक्त केली. ‘दोगे आत्राम अमर रहे’ च्या गगणभेदी घोषणांनी आसमंत निनादून गेला होता. त्याच्या अंत्ययात्रेला पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नन्नावारे, बुर्गीचे प्रभारी अधिकारी बी. डी. चव्हाण, पी. टी. चाटे, उद्धव कुमरे, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कन्ना मडावी, सरपंच झुरू मडावी, पोलीस पाटील मालू मडावी, ग्रामस्थ व शेकडो पोलीस जवान उपस्थित होते. कांदोळी गावातून शहीद झालेला दोगे हा पहिला पोलीस जवान आहे.
‘पेका’ गेल्याने कांदोळी गहीवरली
By admin | Updated: March 25, 2015 01:47 IST