लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : वाहनाने एखादा अपघात किंवा गुन्हा घडल्यानंतर पाेलीस सदर वाहन जप्त करतात. वाहनाची कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित मालकाला वाहन घरी परत नेता येते. मात्र बहुतांश वाहनमालक अपघात झालेले वाहन घरी परत नेत नाही. परिणामी पाेलीस स्टेशनच्या आवारांमध्ये काेट्यवधी रुपयांची शेकडाे वाहने पडून आहेत. या वाहनांमुळे पाेलीस स्टेशनला जागा अपुरी पडत असल्याने या वाहनांचे करायचे काय, असा प्रश्न पाेलिसांसमाेर निर्माण हाेत आहे. गुन्हा घडल्यानंतर संबंधित वाहन नेमके कुणाच्या मालकीचे आहे, त्या वाहनाचा विमा काढला आहे काय, पीयूसी आहे काय, या सर्व बाबी आरटीओ कार्यालयामार्फत तपासल्या जातात. या सर्व बाबी तपासल्यानंतर वाहन संबंधित मालक परत नेऊ शकते.
बहुतांश वाहने झाली भंगार गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये मागील आठ वर्षांपासूनची वाहने पडून आहेत. आठ वर्षे ऊन व पावसामुळे ही वाहने भंगार झाली आहेत. मशीन गंजल्या आहेत. गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये जवळपास २०० वाहने आहेत. ही वाहने आता भंगारात विकल्याशिवाय पर्याय नाही.
या वाहनांनी व्यापली पाेलीस स्टेशनची जागाक्षतिग्रस्त वाहने पाेलीस स्टेशनमध्ये पडून आहेत. या वाहनांनी जागा व्यापली असल्याने पाेलीस स्टेशनला जागा कमी पडत आहे. त्यामुळे या वाहनांचे काय करावे, असा माेठा प्रश्न पाेलिसांसमाेर पडला आहे.
वाहनाबद्दल चुकीची समजूतज्या वाहनामुळे अपघात हाेऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असल्यास सदर वाहन अपशकून मानल्या जाते. त्या वाहनामुळे अपघाताची आठवण हाेत असल्याने नागरिक सदर वाहन घरी घेऊन जाण्यास तयार हाेत नाही. तसेच कधी कधी वाहन माेठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने ते दुरुस्त करण्यास माेठा खर्च येत असल्याने वाहन परत नेले जात नाही.
अपघातांचे प्रमाण वाढले- वाहनांची संख्या वाढण्याबराेबरच अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विमा काढणे आवश्यक आहे. किमान थर्डपार्टी विमा तरी काढावा.