लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना जिवावर उदार होऊन आपत्कालीन स्थितीत कर्तव्य पार पाडावे लागते. अशास्थितीत त्यांच्या जिवाला धोका झाल्यास कुटुंब उघड्यावर पडू शकते. त्यांच्या कुटुंबाला मदत व्हावी यासाठी शासनाने कर्मचाऱ्याच्या कुटंबाला १० लाखांचे सानुग्रह अनुदान लागू केले आहे.
अग्निशमन दल कर्मचारी कामावर असतानामृत्यू झाला तर : अग्निशमन दलातीलकंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर कुटुंबाला १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.अपंगत्व आले तर : कायमचे अपंगत्व आल्यास जीवितहानीएवढीच रक्कम दिली जाईल. तसेच निम्मे अपंगत्व आल्यास त्यापेक्षा कमी सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांची कोण स्वीकारणार जबाबदारी ?अग्निशमन विभागात स्थायी व कंत्राटी कर्मचारी कार्यरत असतात. जिल्ह्यातही हे कर्मचारी कार्यरत आहेत. अग्निशमन यंत्रणेसह आपत्ती व्यवस्थापनचीही कामे हे कंत्राटी कर्मचारी करीत असतात. बाह्य यंत्रणेमार्फत या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. संबंधित यंत्रणेने ठरवून दिलेले वेतन त्या कर्मचाऱ्यांना मिळते. विशेष म्हणजे स्थायी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या निकषात लाभ दिला जातो.
अग्निशमन विभागात कर्मचारी किती?जिल्ह्यात अग्निशमन विभागात एकूण ३४ कर्मचारी कार्यरत आहेत. गडचिरोली व देसाईगंज येथे प्रत्येकी तीन स्थायी कर्मचारी आहेत. गडचिरोली शहरात कंत्राटी ४ तर देसाईगंज येथे २ कंत्राटी कर्मचारी आहेत. याशिवाय इतर ११ तालुक्यांमध्ये वाहनचालक व मदतनीस असे प्रत्येकी दोन याप्रमाणे २२ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.
"आपत्तीच्या वेळी सर्वच कर्मचारी चोखपणे कर्तव्य बजावतात. दुर्दैवाने काही झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून योग्य सानुग्रह अनुदान मिळणे आवश्यक आहे."- अनिल गोवर्धन, अग्निशमन अधिकारी