वैरागड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची पदे मंजूर असताना यापैकी एक डॉक्टरचे पद भरले आहे. सदर डॉक्टर विविध शासकीय कामांसाठी जिल्हास्थळावर जात असल्याने या कालावधीत येथील औषधी संयोजकच रूग्णांवर उपचार करीत असल्याचे दिसून येते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मडावी, डॉ. खोब्रागडे कार्यरत होते. डॉ. मडावी यांची बढतीवर जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर दुसऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याची वैरागड येथे नियुक्ती करण्यात आली. दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असताना मध्येच डॉ. खोब्रागडे यांचे सुद्धा पळसगाव येथील दवाखान्यात बदली करण्यात आली. त्यामुळे वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात आता केवळ एकच वैद्यकीय अधिकारी शिल्लक राहिला आहे. वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात २० ते २५ गावे येतात. या गावांमधील बहुतांश रूग्ण वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय बैठक, अंगणवाडी तपासणी, आरोग्य शिबिर यासाठी जावे लागते. त्यामुळे रूग्णालयात एकही डॉक्टर राहत नाही. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रूग्णांची फार मोठी हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
एकाच डॉक्टरवर पीएचसीचा भार
By admin | Updated: January 8, 2015 22:55 IST