गडचिरोली : एकूण पाणीपट्टीच्या मागणीपैकी २२ जानेवारीपर्यंत ३९ लाख ३८ हजार रूपये पाणीपट्टी वसूल करण्यात आली असून एकूण पाणीपट्टीची मागणी एक कोटी रूपये एवढी आहे. गडचिरोली शहराला जवळच्या वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी शहरानजीक स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी नागरिकांना पुरविले जाते. गडचिरोली शहराला नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात एकूण सात पाण्याच्या टाक्या असून ५ हजार ८९२ नळधारक आहेत. अर्धा इंच नळावर नगर परिषद प्रशासन प्रतिवर्ष १ हजार २०० रूपये, पाऊन इंच नळावर २ हजार ३३३ रूपये पाणी कर आकारते. शहरातील एकूण नळधारकांकडून एका वर्षात एक कोटी रूपयांचा पाणी कर गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३९ लाख ३८ हजार रूपये एवढा पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. नदीतून पाण्याचा उपसा करून सदर पाणी जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाते. जलशुद्धीकरण करण्यासाठी आलम, ब्लिचिंग पावडर वापरावे लागते. यासाठी दर दिवशी हजारो रूपये खर्च होतात. त्याचबरोबर हे काम करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाच ते सहा कर्मचारी आहेत. यांचे वेतनही द्यावे लागते. शहरात पाणीपुरवठा पाईप फुटल्यास तो दुरूस्त करण्याचा खर्चही नगर परिषदेलाच उचलावा लागतो. यासाठी महिन्याकाठी लाखों रूपये खर्च येतो. हा सर्व खर्च कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशातून केला जातो. पाणीपट्टी वार्षिक स्वरूपात आकारली जात असल्याने बहुतांश नागरिक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच सर्वाधिक बिलाचा भरणा करतात. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत १०० टक्के कर वसूल व्हावा, यासाठी नगर परिषद प्रशासनाचा कर विभाग कामाला लागला आहे. यासाठी स्वतंत्र तीन पथक नेमले असून या पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन कराची वसुली करीत आहेत. त्याचबरोबर नागरिकांना कर भरण्याचे आवाहनदेखील करीत आहेत. मागील वर्षीही नगर परिषदेने १०० टक्के कराची वसुली केली होती. यावर्षी सुद्धा पूर्ण कर वसूल व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. (नगर प्रतिनिधी)
पाणीपट्टी ४० टक्के वसूल
By admin | Updated: January 24, 2015 00:53 IST