वडसा वन विभागाचा उपक्रम : टाकाऊच्या सदुपयोगातून रोपवनाला नवसंजीवनीदेसाईगंज : पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व घनकचऱ्यामुळे प्रदूषणात वाढत होत आहे. याचे मानवाला मोठे परिणाम भोगावे लागत आहे. या प्रदूषणावर मात करीत पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर रोपवनातील रोपांना पाणी पोहोचविण्यासाठी करून वडसा वन विभागाने रोपवनातील रोपांना नवसंजीवनी दिली आहे. वडसा वन विभागाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लग्नकार्य, शासकीय, खासगी कार्यशाळा व इतर समारंभात बिस्लरीतील पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. दिवसेंदिवस बिस्लरीच्या पाण्याचा वापर वाढत चालला आहे. मात्र तहाण भागल्यानंतर रिकाम्या झालेल्या या बॉटल्स इतरत्र कुठेही अस्ताव्यस्त फेकून दिल्या जातात. यामुळे बाटल्यांचा ढीग निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात मृदाप्रदूषण वाढते. अशाप्रकारचे मृदाप्रदूषण होऊ नये, यासाठी वडसा विभागाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. वडसा वन विभागामार्फत कक्ष क्र. ८७० मध्ये एकूण ५० हेक्टर क्षेत्रावर रोपवन तयार करण्यात आले आहे. या रोपवनात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जमिनीची भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे रोपांनाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वडसा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या या रोपवनात रोपांना पाणी देण्यासाठी पाच हजार रिकाम्या बॉटल्सचा वापर केला आहे. रिकाम्या बॉटलला झाकण असलेल्या बाजुने सुईने छिद्र पाडून सदर बॉटल झाडाच्या तळाशी १० ते १५ सेमी खोल अर्धवट पुरून ठेवण्यात आली आहे. यामुळे बाटल्यांमधील पाणी मुळांना मिळत आहे. झाकण नसलेल्या बॉटलला वरच्या बाजुने कापून खालच्या भागास सुईने दोन बारीक छिद्र करून सदर बॉटल झाडाच्या बुडाशी अर्धवट पुरून टाकण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. झाडांची वाढही जोमाने होत आहे. उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमासाठी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी चांदेवार, माडावार, मडावी व वनमजुरांचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)
बाटल्यांच्या माध्यमातून रोपांना पाणी
By admin | Updated: January 8, 2016 02:10 IST