जलसंकट तीव्र होणार : अनेक नळ योजना प्रभावित होण्याच्या मार्गावर गडचिरोली : अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात अडविण्यात येणारे पाणी व वाढलेल्या पाणी पुरवठा योजना यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर जानेवारी महिन्यात तब्बल दोन फुटाने घटला होता. आता होळीनंतर मार्च महिन्यात वैनगंगा नदीचा जलस्तर तीन फुटाने घटला आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत असल्याने या नदीवर अवलंबून असलेल्या अनेक पाणी योजना उन्हाळ्यात प्रभावित होणार आहेत. स्थानिक नगर पालिका प्रशासनाने वैनगंगा नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. या नळ योजनेतील इन्टेकव्हेल व जॅकेवेलमध्ये गाळ साचल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. याशिवाय वैनगंगा नदीचा जलस्तर घटल्यामुळे गडचिरोली शहरवासीयांना १०० टक्के पाणी पुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून होताना दिसून येत नाही. या पाणी समस्येवर उपाययोजना म्हणून पालिकेच्या वतीने नळ योजनेच्या इन्टेकवेल व जॅकवेलमधील गाळ स्वच्छ करून पोकलँड मशीनने नदीपात्र खोल करणे तसेच या विहिरीजवळ रिकाम्या सिमेंट पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधणे या कामासाठीची लिलाव प्रक्रिया राबवून सदर काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहे. गडचिरोली शहरातील पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी १५ मार्च रोजी वैनगंगा नदीवर स्थित विहीर स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंधारा बांधण्याचे निर्देश पालिकेच्या अभियंत्यांना व कर्मचाऱ्यांना दिले. आठ दिवसांत गडचिरोली शहरातील पाणी समस्या मार्गी लागणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र १० दिवसानंतरही या वैनगंगा नदी पात्रात विहिरीलगत बंधारा बांधण्यात आला नाही. त्यामुळे गडचिरोली शहरात पुन्हा जलसंकट तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)चढ भागातील नळधारक कुटुंबीयांची पंचाईतवैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे तसेच पाणी योजनेच्या जॅकवेल व इन्टेकवेलमध्ये गाळ साचल्यामुळे पालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यापासून शहरात दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. सखल भागातील नळधारकांना पुरेसे पाणी मिळत आहे. मात्र चढ भागातील नळाला मुळीच पाणी येत नसल्याने अनेक कुटुंबियांची पाण्यासाठी पंचाईत होत आहे. शेजारील विहीर व हातपंपाचे पाणी आणावे लागत आहे.
वैनगंगेचा जलस्तर आणखी तीन फुटाने घटला
By admin | Updated: March 27, 2016 01:14 IST